

Aurangabad District Bank Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे विधीमंडळाच्या सभागृहात सरकारवर तुटून पडले आहेत. शेतकरी कर्जमाफी, सोलार वीजेची योजना, बियाणे, खत पुरवठा अशा अनेक मुद्यावरून महायुती सरकारवर ते टीका करत आहेत.
तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडत अंबादास दानवे यांनी चक्क महायुतीच्या पॅनलमधून लढण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. आता ते महायुतीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून जिल्हाभरात दणक्यात प्रचारही करत आहेत.
जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण नसते असे समर्थन करत अंबादास दानवे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांचे समर्थक आणि शिवसैनिकही गोंधळात पडले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीतील भाजपा-शिवसेना या दोन प्रमुख पक्षांना अंबादास दानवे हे थेट भिडतात असे चित्र अनेकदा पहायला मिळाले. पण जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मात्र दानवे यांनी ही आपली आक्रमकता बाजूला सारत चक्क महायुतीच्या नेत्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
अर्थात यामागे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार, राज्याचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात झालेला समझौता कारणीभूत असल्याचे बोलले जाते. समृद्धी महामार्गावर झालेली गळा भेट आणि मुंबईत सत्तार-दानवे यांच्यात झालेली खलबते पाहता दानवे यांचा हा निर्णय या सगळ्यांची मिलीभगत असल्याचे दिसून येते.
अंबादास दानवे यांच्यासारखा मोठा मोहरा महायुतीच्या तंबूत शिरल्याने महाविकास आघाडी उघड्यावर पडली आहे. खासदार कल्याण काळे यांनी आता पॅनलपेक्षा आपली जागा कशी निवडून येईल? असे प्रयत्न सुरू केल्याचे दिसते.
महायुतीचे सात संचालक याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमध्ये उडी मारल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. विधान परिषद निवडणुकीत मुलाला माघार घ्यायला लावून अब्दुल सत्तार यांनी टाकलेला डाव योग्य परिणाम साधतोयं असेच या सगळ्या घडामोडींवरून दिसते. मुलगा समीर सत्तार याला बिनविरोध संचालक केल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्याचे प्रयत्न सत्तार यांनी सुरू केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी महायुतीने जिल्ह्यात प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे, महायुतीच्या या प्रचार बैठकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे आमदार अंबादास दानवे देखील सहभागी झाले आहेत. महायुतीच्या गोटात दानवेंची अनपेक्षित एन्ट्री झाल्याने अनेकांना झटका बसला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत संचालकांच्या 8 जागा बिनविरोध निघाल्या.
21 संचालकपदांसाठी ही निवडणूक होत असली तरी वैयक्तीक मतदारसंघातून एकच अर्ज दाखल झालेला होता, तो छाननीतच अवैध ठरल्याने आता हे पद रिक्तच राहणार आहे. त्यामुळे उर्वरित 12 जागांसाठीच हि निवडणूक होत आहे. अर्ज माघारीनंतर आता प्रचाराचा नारळ फुटला असून जिल्ह्यात महायुतीने प्रचाराच्या निमित्ताने बैठकांचा धडाका सुरू केला आहे.
महायुतीतील स्थानिक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गंगापूर व कन्नड तालुक्यांत बैठका झाल्या. मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, प्रशांत बंब, रंजना (संजना) जाधव, अनुराधा चव्हाण, माजी अध्यक्ष अर्जून गाढे यांची प्रमुख उपस्थिती या प्रचाराला होती. यात आणखी एक प्रमुख उपस्थिती होती आमदार अंबादास दानवे यांची.
राज्यातील सत्ताकारणात विरोधी पक्षाच्या तंबूत राहून भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांवर विविधांगी आरोपांची तोफ डागणारे दानवे महायुतीच्या गटात सामील झाल्याने जिल्ह्यातील ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संशयाची सुई निर्माण झाली आहे. दानवे देखील भाजप अन् शिंदेसेनेला जाऊन मिळतात की काय? या विचाराने कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.
अंबादास दानवे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा यापूर्वीदेखील अनेकदा रंगली. जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण नसते. नितीन पाटील यांना साथ देण्यासाठी मी ही निवडणूक महायुतीकडून लढत आहे. या निवडणुकीचा आणि पक्षीय राजकारणाचा संबंध नाही', असे स्पष्टीकरण सध्या दानवे देत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.