
Shivsena UBT News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल 27 जुलै रोजी वाढदिवस साजरा झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्याने तो खासही ठरला. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून आष्टीकर यांना शुभेच्छा दिल्याने याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनीही आष्टीकर यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना त्यांच्याकडून एक वचनही घेतले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहणाऱ्या मराठवाड्यातील नेत्यांमध्ये नागेश पाटील आष्टीकर हेही होते. या निष्ठेचे बक्षीस म्हणून त्यांना हिंगोली मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली. मतदारांनी आष्टीकर यांना निवडून दिल्लीत पाठवले आणि हिंगोली मतदारसंघावरील भगवा कायम राखला. मध्यंतरीच्या काळात आॅपेशन लोटसची चर्चा झाली तेव्हा नागेश पाटील आष्टीकर यांचेही नाव भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या खासदारांच्या यादीत होते, असे बोलले गेले. पण कालांतराने हे आॅपरेशन थंड झाले आणि त्याची चर्चाही.
आता पुन्हा एकदा या आॅपेरशनबद्दल चर्चा झडू लागल्या आहेत. (Shivsena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदाराला केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा फोन येणे ही साधी गोष्ट नाही. यामागे मोठी मोहिम किंवा कारण निश्चित असू शकेल, असे आता बोलले जाऊ लागले आहे. अमित शहा यांच्या आष्टीकरांना आलेल्या फोनने राजकारणात खळबळ उडाली असतानाच उद्धव ठाकरे यांनीही आपल्या खासदाराला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पक्षप्रमुखांशी फोनवरून झालेल्या संवादामध्ये खासदार आष्टीकर यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
तुम जिओ हजारो साल..
नागेश पाटील आष्टीकर यांना शुभेच्छा देतांना साथ कायम ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. यावर साहेब ही काही सांगायची गोष्ट आहे का? तुमचा आशीर्वाद कायम असू द्या, असे म्हणत आष्टीकर यांनी एक निष्ठ राहण्याचा शब्द दिला. यावर नाही, मी तुम्हाला 'तुम जिओ हजारो साल' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आमची साथ देखील हजारो वर्ष द्यावी लागेल, सोबत राहावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करत लढलेल्या शिवसेनेने मराठवाड्यासह राज्यातील काही भागात आपल्या जागा राखल्या. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि धाराशीव या तीन जागा राखत हा भाग अजूनही शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे यातून दिसून आले होते. परंतु भाजपाचा अजूनही आपल्या खासदारांवर डोळा आहे, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. दिल्लीत त्यांच्या खासदारांसाठी भोजनावळींचे आयोजन करत त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.
अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आपल्या खासदाराला फोन आला म्हटल्यावर उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच ठाकरे यांनी त्यांच्याकडून सोबत राहण्याचे वचनही घेतले. आता 'प्राण जाये पर वचन न जाये' प्रमाणे ते पाळतात की मग? सत्तेसाठी वचन मोडतात हे येणारा काळच ठरवेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.