Loksabha Election 2024 : 'ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला 70 वर्षे भरभरून दिलं, तुमच्यावर प्रेम केलं. त्या पक्षाला सोडून तुम्ही गेलात, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोरकं करून गेलात. पण ही जनता आम्हाला पोरकं करणार नाही,' अशा शब्दांत महाविकास आघाडी नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली.
'आज माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी तुम्ही उन्हात, उपाशीतापाशी आलात, हे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. मला विश्वास आहे, येत्या 26 तारखेला विजयाचा गुलाल मला नाही, तर तुम्हाला म्हणजे जनतेला लागणार आहे,' असा विश्वासही वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला. नांदेड लोकसभा मतदारसंघातून(Nanded Loksabha Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, आपल्याला मैदान मिळू नये म्हणून राजकीय दबाव आणला गेला, लोहा-कंधारहून येणाऱ्या 100 गाड्या रोखल्या. पण ही दादागिरी वसंत चव्हाण चालू देणार नाही,' असा इशारा त्यांनी नांदेड गुरुद्वाराजवळील मैदानावर महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली, यामध्ये बोलताना दिला.
अमित देशमुख(Amit Deshmukh) यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर वसंतराव चव्हाण यांनी भाषण केले. या वेळी लोकांचा प्रतिसाद पाहून ते भावूकही झाले होते. 'पक्षात सगळं काही मिळूनही जे पक्ष सोडून गेले, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोरकं करून गेले, त्यांना जनता कधी माफ करणार नाही आणि हीच जनता आपल्याला कधी पोरकं करणार नाही. निवडणुकीचा फैसला तुम्हीच ठरवणार आहात. ज्यांनी तुमच्यावर सत्तर वर्षे प्रेम केलं, त्या पक्षाला सोडून, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तुम्ही पोरकं करून गेलात. पण ही जनता आम्हाला पोरकं होऊ देणार नाही,' असा विश्वास देणारी ही गर्दी आहे.
याशिवाय 'नोकऱ्या, शेतकऱ्याच्या मालाला हमी भावाची गॅरंटी तुम्ही दिली होती, ती कुठे गेली. नांदेडच्या खासदाराने पाच वर्षांत एक पीठाची गिरणी इथे आणली नाही. पाच वर्षे कशी काढली हे समोर बसलेल्या जनतेला माहीत आहे. पाच वर्षांत खासदाराने काय केले? याचा लेखाजोखा द्यावा लागेल. फक्त बॅनरबाजी, पत्रकबाजी करून निवडणूक जिंकता येत नाही. कोरड्या भाषणाने लोकांची पोटं भरणार नाहीत,' असा टोला वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) यांनी लगावला.
'देशात लोकशाही नाही, हुकूमशाही सुरू आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ते चांगल काम करत असताना जेलमध्ये टाकलं. बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं, ही लोकशाही नाही, हुकूमशाही आहे, तीच आता मोडून काढायची आहे. महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी तुम्ही काय काय केले, हे लोक पाहत आहेत. अजित पवारांच्या 70 हजार कोटींच्या फायलीचं काय झालं? सरकारमधले 50 टक्के मंत्री आयात केलेले आहेत. चार सौ पारचा नारा संविधान बदलण्यासाठीच आहे,' अशी टीका चव्हाण यांनी केली.
याशिवाय 'संविधान वाचवण्यासाठीच काँग्रेसने ही लढाई हाती घेतली आहे. राहुल गांधी दहा हजार किलोमीटरची यात्रा काढतात ही सोपी गोष्ट नाही. भाजपकडे अमाप पैसा, पण ही तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. जे गेले ते गेले, पण नांदेड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. मी मालवाला नाही, सामान्य शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उभा आहे. माझा फोन कधीही स्वीच ऑफ राहणार नाही. पंधरा वर्षांपासून माझा एकच नंबर, इतरांसारखे दहा नंबर नाहीत,'' असा टोला वसंतराव चव्हाण यांनी चिखलीकरांचं नाव न घेता लगावला.
तसेच, '26 तारखेचा गुलाल मला नाही, तर तुम्हाला लागणार आहे, असे सांगतानाच अमित देशमुखांना मुख्यमंत्री पदावर बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता मराठवाड्यात तेच आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असेही वसंत चव्हाण म्हणाले. विरोधकांना निवडून येण्याची गॅरंटी नाही, कंधारचं पार्सल पुन्हा पाठवू. मी स्थानिक ते लातूर मतदारसंघातले आहेत. पाच वर्षे मला संधी देऊन बघा,' असे आवाहनही शेवटी चव्हाण यांनी केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.