Chhatrpati Sambhajinagar News : माझ्या नावातच सत्ता असल्यामुळे जिकडे सत्ता तिकडे सत्तार, अस नेहमी छातीठोकपणे सांगणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मजूर सहकार पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवत एकहाती विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांचा संघाच्या 15 संचालक मंडळासाठी शनिवारी (ता. 20) रोजी मतदान झाले होते.
मतमोजणी रविवारी झाली त्यात अब्दुल सत्तार यांच्या मजूर सहकार विकास पॅनले 15 पैकी 13 जागा जिंकत विरोधी परिवर्तन विकास पॅनलचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे मोठे भाऊ अब्दुल गफ्फार अब्दुल नबी हेही विजयी झाले आहेत. तर विरोधी परिवर्तन विकास पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. यात सुनील जैस्वाल आणि बादशाह पटेल हे विजयी झाले.
एकूण 452 मतदारांनी मतदान करत नवे संचालक मंडळ निवडले. मजूर सहकार पॅनलचे दादाराव वानखेडे हे सर्वाधिक 302 मते घेऊन विजयी झाले. सत्तार यांच्या पॅनलच्या नारप्पा आणि मनिषा डोळस या दोन उमेदवारांचा मात्र पराभव झाला. या निवडणुकीच्या प्रचारात केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांनीही सहभाग घेतल्यामुळे पहिल्यांदा या निवडणुकीची चर्चा जिल्हाभरात झाली होती.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandippan Bhumre) यांनीही सत्तार यांच्या पॅनलचा प्रचार केला होता. खुलताबाद येथील प्रचार सभेत एका चेअरमनने संदीपान भुमरे यांच्या समोरच त्यांच्यावर विकासकामे मिळवण्यासाठी 15 टक्के द्यावे लागतात, असा गंभीर आरोप केला होता. यामुळे ही निवडणुक चांगलीच चर्चेत आली होती.
विरोधी परिवर्तन विकास पॅनलने ही निवडणुक फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यांच्याकडे तुल्यबळ असे नेतृत्व नसल्याने या पॅनलचा धुव्वा उडाला. दुसरीकडे मजूर विकास सहकारी पॅनलच्या पाठीशी अब्दुल सत्तार, भागवत कराड, कल्याण काळे, रमेश गायकवाड हे मार्गदर्शकांच्या भूमिकेत होते.
(Edited by Sachin Waghmare)