पृथा वीर
Chhatrapati Sambhajinagar : संपूर्ण राज्यात गाजलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय अखेर सरकारने घेतला. पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर विरोधी पक्षासह सत्ताधारी भाजपनेही विद्यादीप बालगृह बंद करावे, अशी मागणी लावून धरली होती. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांना निलंबित केले जाईल, अशी घोषणा करतानाचा विद्यादीप बालगृहाची मुदत संपली असेल तर नव्याने या संस्थेला परवानगी देण्यात येणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
मानसिक छळ आणि कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावल्याने इथल्या छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातील 9 मुलींनी 30 जून रोजी बालगृहातून पळ काढला होता. (Chhatrapati Sambhajinagar) बालगृहातून पळ काढताना काही मुलींनी स्वतःच्या हातावर काचेने वार करत जखमी करून घेतले. आपले म्हणणे कुणी ऐकत नाही म्हणून त्यांनी थेट सत्र न्यायालयात पोचण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी दामिनी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्या दिवशी सात मुलीच सापडल्या. दोन मुली पोलिसांच्या हाती लागल्या नाही. नंतर या दोन्ही मुली सापडल्या. मुलींना बालगृहातून का पळावे लागले? याची चौकशी झाली.
या घटनेचे तीव्र पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह भाजप आमदार श्रीकांत भारतीय, चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उचलून धरत बालगृह बंद करावे, अशी मागणी केली होती. (Assembly Session) त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 जुलैला छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे निलंबन व विद्यादीपला पुन्हा मान्यता मिळणार नसल्याची ग्वाही अधिवेशनात दिली.
तर राष्ट्रीय महिला आयोग व औरंगाबाद खंडपीठाने या घटनेची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली. विद्यादीप बालगृहातून 9 मुलींनी 30 जून रोजी पळ काढला होता. या घटनेनंतरही बालगृहातील काही गैरप्रकार व घटना समोर आल्यानंतर यांचा स्वतंत्र तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या समितीकडून सुरू आहे. महिला बालविकास आयुक्तालयाने बालकल्याण समिती व विद्यादीप बालगृह यांना स्वतंत्रपणे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दिलेल्या मुदतीत बालकल्याण समिती व बालगृह यांच्याकडून कुठलाही खुलासा न आल्यास त्यांचे कोणतेही म्हणणे नाही असे गृहीत धरून प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही महिला बालविकास आयुक्तलयाने दिला. तसेच बालकल्याण समिती व विद्यादीप बालगृह यांना जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत खुलासा पाठवायचा असल्याचे सांगितले. तर 14 जुलैला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला बैठक झाली.
यावेळी बालगृहांसाठी स्वतंत्र निरीक्षण समित्या स्थापन कराव्या असे वेगवेगळ्या विषयांवर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल , अशी ग्वाही महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. तर या बालगृहातून मुलींना इतर बालगृहात हलवण्याचे आदेश महिला बालविकास आयुक्तालयाने नुकतेच दिले. विद्यादीप बालगृहानेही आम्ही मुलींना आता सांभाळण्यात असक्षम असल्याचे पत्र महिला बालविकास विभागाला दिले. त्यानुसार 26 मुलींना शहरातीलच एका बालगृहात पाठवण्यात आले तर 10 मुलींना पालकांकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.