

Marathwada Teachers Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर अठरा वर्ष तर शिक्षक मतदार संघावर गेल्या तीस वर्षापासून अनुक्रमे सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे यांनी वर्चस्व कायम राखले. परंतु नुकत्याच झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या नवख्या प्रतापसिंह पाटील यांनी धूळ चारली. दांडगा जनसंपर्क, मजबूत निवडणूक प्रचार यंत्रणा आणि आर्थिक ताकद असताना सतीश चव्हाण यांचा झालेला पराभव सत्ताधारी राष्ट्रवादीसाठी धक्का समजला जात आहे. पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्याने २०२९ मध्ये होणाऱ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सलग चार टर्म आमदार असलेले विक्रम काळे आतापासूनच सावध झाले आहेत.
आपल्या कार्यकाळात शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी विक्रम काळे यांनी वेगाने पाठपुरावा सुरू केला आहे. नुकतेच त्यांनी टप्पा अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढाकार घेत काही मागण्या राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केल्या आहेत. टप्पा अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार वाढीव अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करून यापुढे १००% अनुदान देण्यात यावे.
तसेच, आवश्यक त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना राहिलेला अनुदानाचा टप्पा मंजूर करून सर्व शाळांना समान टप्प्यावर आणावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. शिक्षकांच्या प्रदीर्घ संघर्षाला न्याय मिळावा आणि त्यांच्या सेवेला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती या माध्यमातून काळे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी विक्रम काळे यांच्यावर होती. काळे-चव्हाण ही जोडी विधान परिषदेत कायम एकत्र दिसली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर आता ही जोडी फुटली आहे. पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड चव्हाण यांच्या पराभवानंतर ढीली झाली आहे. या पराभवाचा परिणाम २०२९ मध्ये होणाऱ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघ आणि त्याच्या उमेदवारीवर होऊ नये याची काळजी विक्रम काळे आतापासूनच घेऊ लागले आहेत.
विक्रम काळे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली तर ते सलग पाचव्यांदा निवडणूक रिंगणात राहतील. परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये सतीश चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी आणि तगड्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाकरी फिरवतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आपल्या विरोधात अॅन्टी इन्कमबन्सी होती, अशी जाहीर कबुली सतीश चव्हाण यांनी माध्यमांना दिली होती. देशपातळीवर झालेल्या झेन जींच्या आंदोलनाचा प्रभाव देखील या निवडणुकीवर पडल्याचे चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे यांच्याविरोधातील अॅन्टी इन्कमबन्सीचा फटाक पक्षाला बसू नये यासाठी काही वेगळे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आपली उमेदवारी कायम राहावी यासाठी काळे आतापासूनच कामाला लागल्याचे चित्र आहे.
विक्रम काळे हे दिवंगत वसंत काळे यांचे पुत्र आहेत. वसंत काळे यांनी २००४ मध्ये मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण केले.विक्रम काळे यांनी २०१० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये ते पुन्हा निवडून आले. जानेवारी २०२३ मध्ये भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव करून त्यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला. २०२३ च्या निवडणुकीत त्यांना २३ हजार ५८० मते मिळाली, तर किरण पाटील यांना १६ हजार ६४३ मते मिळाली. विजयाचे मताधिक्य ६ हजार ९३७ होते. त्यांचा सध्याचा कार्यकाळ ८ फेब्रुवारी २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२९ असा आहे. म्हणजेच पुढील नियमित निवडणूक २०२९ मध्ये अपेक्षित आहे.
अंशतः अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदान, जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आर्थिक संरक्षण, कॅशलेस वैद्यकीय शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विनामूल्य किंवा कॅशलेस वैद्यकीय उपचारांची सुविधा, आश्वासित प्रगती योजना १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणाऱ्या लाभांचा प्रश्न, सेवा संरक्षण आणि वेतनविषयक प्रश्न, यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या सेवा अटी, वेतनश्रेणी, पदोन्नती आणि अन्य प्रशासकीय अडचणी, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार जसे की जनगणना, निवडणूक, मतदार यादी अद्ययावत करणे अशा कामांमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा यावर त्यांनी विधान परिषदेत आवाज उठवला आहे.
सलग चार वेळा निवडून आल्यानंतर शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र अनुदान, जुनी पेन्शन, वैद्यकीय सुविधा आणि सेवा संरक्षण यांसारखे प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेले नाहीत. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष निर्णय घडवून आणणे आवश्यक ठरणार आहे. पदवीधरमध्ये सतीश चव्हाणांचा पराभव झाल्यानंतरआता विक्रम काळेंसमोर २०२९ चे आव्हान असणार आहे. राहिलेल्या अडीच तीन वर्षाच्या कार्यकाळात शिक्षकांचे प्रश्न सोडवून विक्रम काळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखणार? हा खरा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.