

Mumbai News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला असून, महायुतीने कायद्यात बदल करून आपला अध्यक्ष करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा जनादेश नाकारत मागच्या दाराने गोकुळचा ताबा घेण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रवादी करताना दिसत आहेत. यावरून काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, आमदार सतेज पाटील यांनी रस्त्यावरची लढाई लढण्याची घोषणा करत आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. अशातच आता सत्ताधारी महायुतीमध्येच अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, उभी फूट पडली आहे. शासननियुक्त सदस्य निवडीच्या प्रक्रियेत डावलण्यात आल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
गोकुळच्या निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या असून, महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. महायुतीचा निसटता पराभव झाला असून, सत्ता सतेज पाटलांच्या पॅनेलचीच येणार, अशी चर्चा होती. पण अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १४ सदस्यांच्या कोरमचा मुद्दा आता अडचणीचा ठरत आहे. यामुळे बहुमत असूनही सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचा अध्यक्ष होऊ शकणार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे. यामुळे सतेज पाटील यांनी आधीच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे दार ठोठावले आहे.
यानंतर आता १० तारखेला अध्यक्ष निवडीची सभा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. पण त्याआधीच कॅबिनेट बैठकीत महायुतीने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेत नव्या पाच सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. तर या पाचपैकी चार जणांना मतदानाचा अधिकार दिला आहे. यामुळे महायुतीचे संख्याबळ १६ पर्यंत पोहोचले आहे. परिणामी, गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे.
यावर आता सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच या प्रकरणाची चर्चा आता देशपातळीवर होत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीसुद्धा गोकुळमध्ये मागच्या दाराने केलेल्या कारनाम्यावर कडाडून प्रहार केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरमध्येही संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
अशातच महायुतीमधील मित्रपक्षांनी आपली नाराजी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडे व्यक्त केली आहे. महायुतीमधील प्रमुख पक्षांनी मित्रपक्षांना शासननियुक्त सदस्य निवडीमध्ये योग्य संधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले गेले नसल्यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या घडामोडींमुळे महायुतीच्या अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात याचे राजकीय परिणाम दिसण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर प्रमुख पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा ९ तारखेला सकाळी दहा वाजता दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने स्वाभिमानी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. आता त्यांच्या या लढ्याला उद्धव ठाकरे यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. त्यांनी फोन करून आपला पाठिंबा दर्शवला आहे. लोकशाही मार्गाने सतेज पाटील यांचे पॅनेल निवडून आले आहे. पण हे लोक हुकूमशाही मार्गाने वाटचाल करत आहेत. अतिरिक्त चार जणांची नियुक्ती करून लोकशाहीची हत्या करत आहेत. देशाची वाटचाल लोकशाही मार्गाने व्हायला हवी. त्यामुळे आपण सतेज पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.