

Vilasrao Deshmukh: लातूर महापालिका निवडणुकीत भाजपचे कमळ फुलवण्यासाठी राज्यातील नेत्यांनी या शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नेत्यांकडून जोरकस भाषणंही केली जात आहेत. पण याच उत्साहाच्या भरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलेल्या एका विधानाने लातूरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
लातूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात घोषणांमधील उत्साह पाहून रविंद्र चव्हाण म्हणाले, "तुमचा उत्साह पाहून मला शंभर टक्के खात्री पटली आहे, की आता या शहरातून विलासरावाच्या आठवणी निश्तिच पुसल्या जातील" रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या या विधानाचे संतप्त पडसाद आता लातूरमध्ये उमटतांना दिसतायेत. विशेषत: काँग्रेस आणि विलासराव देशमुख समर्थकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भाजपवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत 'झिरो टू हिरो' ठरलेल्या भाजपसाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे हे वक्तव्य डोकेदुखी आणि पक्षाच्या यशावर परिणाम करणारे ठरू शकते, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. लातूर महापालिकेची ही तिसरी निवडणूक आहे. दोनवेळा महापालिका काँग्रेस पक्षाने जिंकली होती. गेल्यावेळी भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर देत दोन नगरसेवक अधिकचे निवडून आणत लातूर महापालिकेत पहिल्यांदा कमळ फुलवले होते. पण अडीच वर्षानंतर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी पुन्हा सत्ता खेचून आणली आणि महापौरही केला.
आता पुन्हा महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर अमित देशमुख महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी मैदानात उतरले आहेत. निवडणुक प्रचारात अमित देशमुख विरुद्ध भाजपचे निवडणुक प्रभारी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात कलगितुरा आधीच सुरू झाला आहे. पण तो सुरू असताना रविंद्र चव्हाण यांनी "विलासराव देशमुख यांच्या शहरातील आठवणी शंभर टक्के पुसल्या जातील, याची खात्री पटते" असे विधान केले. हे विधान भाजपसाठी सेल्फ गोल ठरू शकते, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्याचा झालेला विकास कोणीही नाकारू शकत नाही. अगदी त्यांचे राजकीय विरोधकही हे मान्य करतात, असे असताना ऐन महापालिका निवडणुकीतच भाजप प्रदेशाध्यक्षांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील असे विधान करून काँग्रेसच्या हाती आयते कोलित दिले आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाची सोशल मिडिया टीम अॅक्टीव्ह झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण भाजप आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. चव्हाण साहेब, आमचा पक्ष जरी वेगळे असला तरी लातूरची शान आहेत विलासराव देशमुख साहेब कायम आठवणीत राहतील, आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत. भाजपने नीच राजकारणाची पातळी ओलांडत आता थेट विलासराव यांची स्मृती लातूरमधून पुसून काढू" असं वक्तव्य केलं आहे. विलासराव देशमुख यांचा अपमान म्हणजे लातूरकरांच्या संस्कृतीवर आणि निष्ठेवर थेट हल्ला आहे. आम्ही लातूरकर या घमंडी भाजपला येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच जागा दाखवू. लढाई लातूरच्या अस्मितेची, लढाई लातूरकरांची अशा शब्दात काँग्रेस व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.