Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपास वेगाने सुरु आहे. या हत्या प्रकरणाचा तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपासाच्या कामाला वेग आला आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना मदत करणाऱ्यांना शुक्रवारी ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी सकाळीच एसआयटीने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेल्या दोघाला ताब्यात घेतले.
त्यांनतर सरपंच संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती आरोपींना देणाऱ्या मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणेला शनिवारी सकाळी कल्याणमधून पोलिसांनी उचलले. तर शनिवारी अटक केलेल्या तिघांना कोर्टासमोर उभे केले असता बीड जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची सीआयडी (CID) कोठडी सुनावली. यावेळी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून 'आका' म्हणवला जाणाऱ्याच्या नावाचा उल्लेख युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला.
या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी पुण्यातून अटक केली. तर सिद्धार्थ सोनावणे याला कल्याणमधून उचलले होते. या तिघांना शनिवारी दुपारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात पहिल्या दिवसापासून आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सातत्याने 'आका'चा उल्लेख केला. यावरुन धसांनी अनेकावर निशाणा साधला. आता हा 'आका' नेमका कोण? याबद्दल आरोपीच्या वकिलांनी मोठा दावा केला. 'आका- आका' म्हटले जात आहे. तो आका म्हणजे विष्णू चाटे हाच आहे, तो आधीपासूनच कोठडीत आहे, असा दावा त्यांनी केला.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी केज न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हे लोक संघटित गुन्हेगारी करतात. टोळीने गुन्हे करतात, उद्योगधंद्यांना त्रास द्यायचे काम करतात, यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे येत नाहीत. तसेच पोलिसांकडून 15 दिवसांच्या रिमांडची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यासोबतच मकोकाअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
कोर्टात करण्यात आलेल्या या मागणीला आरोपींच्या वकिलांने विरोध केला. आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चताप नाही, असे म्हणता येणार नाही, असे आरोपीच्या वकीलांनी स्पष्ट केले. आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेलेले मुद्दे पुरेसे नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून 'आका' म्हणवला जाणारा विष्णू चाटे यालाही आधीपासूनच पोलिसांनी अटक केली आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने कोर्टात केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.