

Chhatrapati Sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगर शहराचे राजकारण आणि बड्या नेत्यांच्या कारकीर्दीची जिथून सुरवात झाली त्या गुलमंडी प्रभागाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे दुसऱ्यांदा महापालिकेत जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश यांचे राजकीय लॉन्चिग याच प्रभागातून होऊ पाहत आहे. हिंदू-मुस्लिम-दलित व इतर अशा सर्वच समाजाच्या मतदारांनी व्यापलेल्या या मतदारसंघात मत विभाजन महत्वाचे ठरणार आहे. यावर एमआयएमच्या उमेदवाराची लॉटरी लागणार का? हे कोडे सुटणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे हृदयस्थान आणि राजकारणाचा कायम केंद्रबिंदू ठरत आलेल्या गुलमंडी प्रभागातील लढतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे. शिवसेना पक्षाची स्थापना, पहिली शाखा ज्या गुलमंडीवर स्थापन झाली तो हा प्रभाग. चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी यांच्यासारखे नेते याच गुलमंडीमधून घडले आणि पुढे राजकारणात नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, राज्यात मंत्री झाले. आता या नेत्यांची पुढची पिढी मैदानात उतरली आहे.
पुर्वीच्या औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता, आमदार, खासदार व सगळ्या संस्था असे चित्र असायचे. पण शिवसेनेच्या आगमनानंतर शहरातील राजकीय चित्र बदलले. 1986 मध्ये झालेली जातीय दंगल आणि त्यानंतर 1988 मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे सत्तावीस नगरसेवक निवडून आले होते. तेव्हापासून या पक्षाने शहरावर हळूहळू वर्चस्व निर्माण करायला सुरूवात केली. 2008 पूर्वी औरंगाबाद पूर्व आणि पश्चिम असे दोन विधानसभेचे मतदारसंघ शहरात होते. त्यानंतर मध्य हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला.
1990 आणि त्यानंतर 95 अशा सलग दोन निवडणुकीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व चंद्रकांत खैरे यांनी केले. तर आता गुलमंडी प्रभाग ज्या मतदारसंघात येतो तो मध्य विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच असून प्रदीप जैस्वाल हे तीन टर्म इथून निवडून आले आहेत. आता त्यांचाच मुलगा गुलमंडी प्रभागातील ड मधून निवडणूक रिंगणात आहे. तर याच प्रभागातील अ एससी राखीव मधून चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे हे आपला जुना बेगमपुरा वार्ड बदलून गुलमंडीतून मैदानात आहेत. आमदार पुत्र ऋषीकेश जैस्वाल यांची लढत भाजपच्या मिथून व्यास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लक्ष्मीनारायण बखरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद नरवडे आणि एमआयएमचे मोहंमद जोहेब यांच्याशी आहे.
गुलमंडी हा प्रभाग शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचा समजला जातो. व्यापार, संपूर्ण शहरातील लोकांचा मोठ्या खरेदीसाठी ओढा आणि कुठल्याही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना, घडामोडींचे सर्वात आधी पडसाद उमटण्याचे ठिकाण म्हणून गुलमंडीकडे पाहिले जाते. छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील म्हणून ओळखले जाते. या शहराला जातीय दंगलींचा काळा इतिहास आहे. येथील सामाजिक समीकरण, शहराची रचना ही दोन भागात विभागली गेली आहे. गुलमंडीवर ज्या राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे वर्चस्व त्याचे शहरावर वर्चस्व असे बोलले जाते. त्यामुळे कधी काळी एकाच पक्षात असलेले परंतु आता फुटीमुळे एकमेकांचे विरोधक असलेल्या चंद्रकांत खैरे, किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल या नेत्यांची प्रतिष्ठा गुलमंडीवर पणाला लागली आहे.
प्रभाग 15,16 आणि 17 हे गुलमंडी प्रभागात येतात. या तीनही प्रभागांमधील बहुतांश परिसर हा जुन्या शहराचा भाग आहे. याशिवाय बहुतांश भाग हा समस्यांच्या विळख्यात अडकलेला आहे. शहागंज भागातील ज्या बसस्थानकाने मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरातून दळणवळणाची दिशा दिली, त्याच बसस्थानकाचा उपयोग दारू, जुगार अड्ड्यांसाठी होताना दिसतो आहे. तीनही प्रभागांमधील कचरा प्रश्न, रुग्णालये आणि शाळांच्या भिंती आजघडीला शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
सण, उत्सवाच्या काळात संपूर्ण शहरातील नागरिक या प्रभागात खरेदीसाठी येतात त्यामुळे इथे पार्किंगची मोठी समस्या आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जसा संपूर्ण शहराला सतावत आहे, तसा तो या जुन्या शहरालाही भेडसावत आहे. अगदी वर्षानुवर्ष सत्ता, महापौर, आमदार, खासदार, मंत्री पद भोगलेल्या नेत्यांच्या घरीही दहा दिवसाला पाणी येते, ही या प्रभागाची ओळख बनली आहे.
या तीन प्रभागाची एकूण लोकसंख्या ही 1 लाख 22 हजार 996 असून एकूण मतदारांची संख्या 1 लाख चार हजार 981 अशी आहे. यामध्ये पुरुष मतदार 53 हजार 68, महिला 51 हजार 911 आणि तृतीयपंथी-दोन यांचा समावेश आहे. या प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या ही निर्णायक आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी एकमेकांच्या विरोधात लढले होते. मोठ्या प्रमाणात हिंदू मतांचे विभाजन झाल्याचा फायदा एमआयएम पक्षाला झाला होता आणि एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते.
मध्य विधानसभा मतदारसंघातील 2014 चा अनुभव लक्षात घेता गुलंमडी प्रभागातील अ या सर्वसाधारण प्रभागात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप या तीन पक्षांकडून चार हिंदू उमेदवार रिंगणात आहेत. तर एमआयएमचा एकमेव उमेदवार मैदानात आहे. हे चित्र पाहता पुन्हा हिंदू मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी कोणाची लॉटरी लागते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गुलमंडी प्रभागातून उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू होती. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी विधानसभेला मी त्याग केला, याची आठवण शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना करून देत मुलगा किंवा भावासाठी उमेदवारीवर दावा सांगितला होता. परंतू तनवाणी यांचा हा त्याग फेटाळत प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषीकेश जैस्वाल याला पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. यापूर्वी या प्रभागातून किशनचंद तनवाणी हे शिवसेनेकडून आणि त्यानंतर त्यांचे भाऊ राजू तनवाणी हे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तनवाणी यांनी मुलगा आणि भावासाठी उमेदवारी मागितली होती. ती नाकारण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा आहे. या अंतर्गत नाराजीचा फटका आणि फायदा कोणाला होणार? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.