

MLC Election : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरुवारी (4 जून) दुपारी 3 वाजता संपली. ही मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदानापूर्वीच महायुतीने 5 मतदारसंघांमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे.
यात कोकणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि पुण्यात विक्रम काकडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली इथून भाजपचे अरुण लखानी तसेच ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी हे बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 12 मतदारसंघांमध्ये मात्र थेट लढती रंगणार असून काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांमुळे चुरस वाढली आहे.
पाच मतदारसंघात बिनविरोध विजय :
कोकण मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाळ उर्फ सुरेंद्र माने आणि अपक्ष उमेदवार जुईली दळवी यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले.
ठाणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अभिजीत पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा मार्ग मोकळा झाला.
यवतमाळ येथे काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात काँग्रेसचे शैलेश अगरवाल यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे बिनविरोध आमदार झाले.
12 मतदारसंघांत थेट लढती
बिनविरोध निवडींनंतर राज्यातील 12 मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार असून काही मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरू शकतात.
नागपूर
भाजपचे राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे
अमरावती
भाजपचे प्रवीण पोटे पाटील विरुद्ध हर्षजित देशमुख
भंडारा-गोंदिया
भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नरेश ईश्वरकर
नांदेड
भाजपचे अमरनाथ राजूरकर विरुद्ध काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर
परभणी-हिंगोली
शिवसेनेचे सईद खान विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे डॉ. विवेक नावंदर
उस्मानाबाद-लातूर
भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख
औरंगाबाद-जालना
भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गणेश लोखंडे
जळगाव
भाजपचे नंदकिशोर महाजन विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शरद तायडे आणि शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांच्यात तिरंगी लढत
सांगली-सातारा
भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अभयसिंह जगताप
सोलापूर
भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वसंतराव देशमुख
अहिल्यानगर
भाजपचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर दत्तात्रय पानसरे
नाशिक
शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध भाजपचे बंडखोर गोकुळ गिते
बंडखोरांमुळे महायुतीची डोकेदुखी
भंडारा-गोंदिया, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक या मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवार रिंगणात असल्याने अधिकृत उमेदवारांची चिंता वाढली आहे. विशेषतः नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गिते मैदानात असल्याने महायुतीसमोर अंतर्गत मतविभाजनाचे आव्हान निर्माण झाले आहे. जळगावमध्येही रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढतीत राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा प्रतिष्ठेचा सामना
पाच जागा बिनविरोध जिंकल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला असला तरी उर्वरित 12 जागांवरील लढती प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, पक्षांतर आणि बंडखोरी यांचा निकालावर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय ताकदीची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.