

Maharashtra MLC election nomination controversy: विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर काही ठिकाणी बंडखोरीचे आव्हान कायम राहिले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (गुरुवार) शेवटचा दिवस असतानाही काही नाराज इच्छुकांनी माघार घेण्यास नकार दिल्याने महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. अनेक दिवस मनधरणी आणि चर्चेचे प्रयत्न करण्यात आले, मात्र काही मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांनी आपली भूमिका बदलली नाही.
राज्यातील 17 विधानपरिषद जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी विरोधकांचा अधिकृत उमेदवार नसल्यामुळे महायुतीच्या काही उमेदवारांचा मार्ग सोपा झाला आहे. आतापर्यंत 5 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून त्यामध्ये भाजपचा 1, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवारांचा समावेश आहे.
दरम्यान, काही मतदारसंघांमध्ये बंडखोरांमुळे लढती रंगतदार झाल्या आहेत. भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नरेश ईश्वरकर मैदानात कायम आहेत. काँग्रेसचे दिलीप बनसोड यांनी मात्र अर्ज मागे घेतला आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गिते निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे गटाकडून अनिल कदम यांची उमेदवारी जाहीर झाली होती, परंतु त्यांनी अर्जच दाखल केला नसल्याने समीकरणे बदलली आहेत.
अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर दत्तात्रय पानसरे यांच्यात थेट सामना होणार आहे. काँग्रेसचे बंडखोर करण ससाणे यांनी अखेर माघार घेतल्याने येथील चित्र काहीसे स्पष्ट झाले आहे.
जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन, उद्धव ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. रेश्मा काळे यांना माघार घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.
एकूणच, अनेक ठिकाणी महायुतीला बिनविरोध विजयाचा फायदा मिळाला असला तरी काही मतदारसंघांतील बंडखोरीमुळे निवडणुकीची उत्सुकता आणि राजकीय तापमान दोन्ही वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.