Nana Patole On Mahayuti Govt : महायुती सरकारने मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
मात्र, राज्य सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन ही योजना सुरु केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच आता याच योजनेवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. शिवाय ही योजना आमचीच असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजने संदर्भात बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, "लाडकी बहीण सारख्या योजना आमच्याच होत्या. अशा 5 योजनांची गॅरंटी राहुल गांधी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली होती. सत्तेतले सरकार आमची नक्कल करायला निघाले आहे. मात्र, नक्कल करायला देखील अक्कल पाहिजे जी अक्कल या सरकारमध्ये नाही. निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीने हा निर्णय घेतला आहे." अशा शब्दात पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली.
तसेच केवळ मतं घेण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. पटोले म्हणाले, "महिला आधीच महागाईच्या बोझ्याखाली आहेत. मागील दहा वर्षापासून सरकारने जनतेला लुटलं आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर मतं घेण्यासाठी सरकारचा एक प्रयोग आहे."
दरम्यान, मनोज जरांगे यांची शांती रॅली आणि शिंदे समिती हैदराबादला जात आहे. या मुद्द्यावरही पटोले यांनी भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी देशात आमचं सरकार आलं असतं तर आता जातीनिहाय जनगणना सुरू झाली असती, असा दावा केला.
ते म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं आश्वासन दिलं होतं. मराठ्यांसह इतर अनेक जातींना भाजपने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं. भाजप एक दोन नव्हे तर मागील दहा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे यांनी आता दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. ती कशी करायची हा त्यांच्या प्रश्न आहे", असं म्हणत त्यांनी काँग्रेसची (Congress) आरक्षणाबाबत काय भूमिका आहे हे देखील स्पष्ट केलं.
पटोले म्हणाले, राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, आमचं सरकार आल्यास आम्ही जातीनिहाय जनगणना करू. मात्र भाजपचं सरकार आम्ही जाती गणनाच करणार नाही, असं म्हणत आहे. म्हणजे केवळ मतं घेण्यासाठी त्यांनी मराठा, धनगर, गोवारी, हलबा समाजाच्या वापर केल्याचा आरोपही पटोलेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.