Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी अपडेट समोर येत आहे.महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता भुजबळांना मंत्रिपद दिले जाणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे मंगळवारी(ता.20) राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. मुंबईच्या राजभवनात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती.
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून अखेरच्या क्षणी डावलण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उघड उघड तीव्र नाराजी दर्शवली होती. तसेच या निर्णयावरुन पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांवर तिखट शब्दांत टीकाही केली होती. आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्यात येत आहे. मंगळवारी राजभवनात 50 लोकांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबईत राजभवनात होत असलेल्या या सोहळ्यासाठी ठराविकच मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मंगळवारी सकाळी 9 वाजता राजभवनामध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मुंडेंनी आपल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्याच खात्याची जबाबदारी आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील क्रूरतेचा कळस गाठणारे फोटो व्हायरल झाल्यानं राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली. लोकभावना लक्षात घेतल्यानंतर 3 मार्च रोजी रात्री अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचं 'अभय' काढून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यनेते अजित पवारांना त्यांचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासूनच मुंडेंचा राजीनामा राष्ट्रवादीत कुणासाठी फायदेशीर ठरणार याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
तब्बल 84 दिवस बीड प्रकरणावरुन आवाज उठवल्यानंतर अखेर मुंडेंनी राजीनामा दिला होता. अखेरच्या क्षणी छगन भुजबळांचा पत्ता कट करुन मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या मुंडेंचीच महायुती सरकारमध्ये पहिली विकेट पडली होती. आता त्यांचा महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याच्या पथ्यावर पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.