NCP Politics: राष्ट्रवादीला घरचा आहेर! स्वीकृत, जिल्हा परिषद अन् दूध संघ निवडीवरून पक्ष नेतृत्वालाच आव्हान

NCP leadership challenge News: स्वीकृत सदस्य, जिल्हा परिषद आणि दूध संघातील निवडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी उफाळली आहे. सुभाष जगताप, विक्रम खुटवड, अमोल नलावडे आणि स्वप्निल ढमढेरे यांनी पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले.
 Ncp News
Ncp NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा परिषद आणि दूध संघातील पदाधिकारी निवडीवरून थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. पक्षाचे आदेश डावलणे, राजीनामे देण्यास नकार देणे आणि ऐनवेळी पदे नाकारणे अशा प्रकारांमुळे पक्षातील शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कात्रज दूध संघात राजीनामा नाट्य

कात्रज दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. पक्षाने आदेश देऊनही अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांनी राजीनामा देण्यास कमालीचे आढेवेढे घेतले. महिला नेत्या वैशाली नागवडे यांनी पक्षाचा निरोप दिल्यानंतरही ढमढेरे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर ज्येष्ठ संचालकांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी पार्थ पवार यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. रविवारी झालेल्या बैठकीत हा राजीनामा मंजूर करण्यात आला.

दुसरीकडे, उपाध्यक्ष मारुती जगताप यांनी पक्ष नेतृत्वाचा आदेश स्पष्टपणे धुडकावला आहे. त्यांनी राजीनामा तर दिला नाहीच, उलट संचालक मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहून ई-मेलद्वारे रजेचा अर्ज पाठवला आणि ते 'नॉट रिचेबल' झाले. त्यांच्या या पवित्र्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

ऐनवेळी धावपळ; विक्रम खुटवड यांचा नकार

जिल्हा परिषदेत सभापती निवडीदरम्यान पक्षाला मोठा धक्का बसला. कृषी आणि पशुसंवर्धन समितीसाठी भोरमधील विक्रम खुटवड यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, मोठ्या पदाची अपेक्षा असलेल्या खुटवड यांनी थेट भर सभेत उठून हे पद घेण्यास नकार दिला. यामुळे पक्षाची मोठी गोची झाली. अखेर ऐनवेळी चक्रे फिरवून काही मिनिटांतच अमोल नलावडे यांचे नाव जाहीर करून त्यांच्याकडे सभापती पदाची सूत्रे सोपवावी लागली.

 Ncp News
Sambhajinagar-Jalna MLC Election: सुहास शिरसाट यांची भाजप पक्षश्रेष्ठींकडून दखल; विधान परिषदेची उमेदवार जाहीर

शहराध्यक्ष सुभाष जगताप यांची नाराजी

महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शहराध्यक्ष सुभाष जगताप हे तीव्र नाराज असल्याचे समजते. शहराध्यक्षपद हाती असूनही त्यांनी अद्याप अधिकृत कार्यकारिणी जाहीर केलेली नाही, तसेच ते पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांनाही दांडी मारत असल्याने त्यांच्याकडूनही पक्षादेश डावलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नेत्यांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात जिल्ह्यातील पक्षांतर्गत मतभेद उघड झाले आहेत. कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदावरून ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील आणि दिलीप मोहिते-पाटील यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता तीव्र झाला आहे. या ज्येष्ठ नेत्यांमधील वादामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्ष वाढवण्याचे आणि संघटना मजबूत करण्याचे आव्हान असताना, पक्षाने पदे दिलेले पदाधिकारीच आता नेतृत्वाला आव्हान देत असल्यानेराष्ट्रवादी समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पक्ष नेतृत्व या बंडखोरांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com