

Mumbai News: उद्धव ठाकरेंची साथ सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या खासदारांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेही सर्वच्या सर्व म्हणजे आठही खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता.8 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या विविध मुद्द्यांवर भाष्य करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आणि मोदींच्या भेटीची अपडेट माहितीही दिली आहे.
सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार सोमवारी(ता.10 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. ही भेट महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित मदत खासदारांना मिळत नाहीत, असे प्रश्न जे विकासाच्या चौकटीतील आहेत, त्यासाठी ही भेट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. ही भेट महाराष्ट्राच्या विकासाच्या चौकटीतले अनेक प्रश्न आमच्या खासदारांचे आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या पक्षाचे आठही खासदार मोदी यांना भेटणार असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
सुळे म्हणाल्या, आमच्या राष्ट्रवादी पक्षातील एक दोन खासदारांची भूमिका होती की, महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत. दुर्दैवानं संसद चालत नाही. त्यामुळे, माननीय पंतप्रधानांना महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, ज्यात पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील. सातत्यानं शहरीकरणात होणारे मोठे प्रश्न आहेत. सगळ्या खासदारांना 5 कोटी रुपयांचा विकासनिधी मिळतो, त्याच्या अंमलबजावणीला आव्हानं येतात, याबाबत भेटायचं आहे.
आपण हे सगळे प्रश्न घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ या का? या भूमिकेतून आठ खासदारांनी मोदींकडे वेळ मागितली होती. आमच्या आठ खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेतील कार्यालयात भेटीची वेळ दिली. एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलावलं होतं, आम्हाला नाश्त्याला बोलावलं नाही, असा चिमटाही सुप्रिया सुळे यांनी मोदी यांना काढला.
सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या एफसीआरए बिलाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध असणार असल्याचंही पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी भारत सरकारला विनंती आहे, एफसीआरए बिलाबाबत घाई करू नका. सरकारने चर्चा केली पाहिजे असंही आवाहन केलं. तसेच ही चर्चा ही लोकशाही मार्गाने व्हायला हवी. एफसीआरए बिल आमच्यावर लादू नका, चर्चा करून योग्य मार्ग काढला पाहिजे, असा सल्लाही सरकारला दिला.
यावेळी खासदार सुळे यांनी आमचं म्हणणं आहे, काही चुकीचे पैसे आलेही असतील, ड्रग्सचे पैसे असू शकतात किंवा काही असेल तर त्याला विरोध करा. पण जर कुणाचे जवळचे काही लोक मदत करणार असेल, तर काय समस्या आहे? सगळ्याकडे वाईट नजरेनंच का बघावं? आम्ही संयुक्त चर्चा करायला तयार असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.