
NCP News : भाजप आणि शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकतं राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता त्यांचे पालकमंत्री नसलेल्या 28 जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तीन जिल्ह्यांसाठी एक याप्रमाणे नऊ मंत्र्यांकडे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी असणार आहे. मंगळवारी (4 मार्च) रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन मजबूत करणे ही या संपर्क मंत्र्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये समन्वय राखणे, जिल्हाभरातील कार्यकत्यांशी नियमित संपर्कात राहून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणे, त्यांच्या कामाला महत्त्व देऊन त्यांना बळकटी देणे, जिल्हा पातळीवर पक्षाच्या सर्व धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करणे अशाही जबाबदाऱ्या या संपर्क मंत्र्यांकडे असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) सध्या बीड, बुलढाणा, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार, वाशिम आणि पुणे या 7 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे उर्वरित 29 जिल्ह्यांमध्ये हे संपर्क मंत्री काम करणार आहेत. यातही सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्रीपद अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले असल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने सध्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. ते भरल्यानंतर या मंत्र्यांकडेही उर्वरित जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
गत महिन्यात भाजपने मित्रपक्ष शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असलेल्या 17 जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक केली होती. त्या घोषणेला महिना होत असतानाच एकनाथ शिंदेंनी यांनी त्यांच्या मंत्र्यांकडे मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या 23 जिल्ह्यांचे संपर्क मंत्रिपद त्यांच्या 11 मंत्र्यांकडे सोपवत 'जशास तसे' उत्तर दिले. आता अजित पवार यांनीही असाच निर्णय घेत शिवसेना आणि भाजपला कॉर्नर केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.