
Solapur, 04 March : भारतीय जनता पक्षाकडून संपर्कमंत्री नेमल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांकडे पक्षवाढीची जबाबदारी सोपवली आहे. शिंदे यांनी 11 मंत्र्यांकडे 23 जिल्ह्यांत पक्षसंघटना बळकटीची मोहीम देण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूरच्या संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील त्यांचे निकटवर्तीय असलेल्या मंत्र्यांकडे दिली आहे, त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद वाढविण्याचे शिवधुनष्य त्यांना पेलावे लागणार आहे.
मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुरबुरी असल्याचे गेल्या तीन महिन्यांत दिसून आले आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात ‘कोल्ड वॉर’ असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री असलेल्या जिल्ह्यात भाजपकडून संपर्कमंत्री नेमण्यात आले होते. आता तोच कित्ता शिवसेनेकडून गिरविण्यात आलेला आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या अकरा मंत्र्यांवर शिवसेना पक्षाच्या वाढीची जबाबदारी दिली आहे. यात सोलापूरची जबाबदारी ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडे देण्यात आलेली आहे. सरनाईक हे शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. शिवसेनेतील बंडावेळी त्यांनी शिंदेंना भक्कम साथ दिली होती. आता सरनाईक यांना भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा धनुष्यबाण वाढविण्याचे आव्हान असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार आहेत. एक ठाकरेंच्या शिवसेनेचा, तर एक शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे. मागील खेपेला सांगोल्यातून निवडून आलेले शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. या वेळी दोन मतदारसंघातून शिवसेनेने निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही ठिकाणी शिवसेनेला अपयश आले आहे.
शिवसेना आणि भाजपचा मतदार एकाच विचाराचा आहे, त्यामुळे भाजपची ताकद कमी करूनच शिवसेनेला वाढावे लागणार आहे. सोलापूरमधील सोलापूर शहर मध्य या मतदारसंघावर भाजपने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दावा केला आहे आणि त्या ठिकाणाहून भाजपचा आमदारही निवडून आलेला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघ शिवसेनेला पुन्हा मिळविणे, त्या मतदारसंघात पक्षाची ताकद निर्माण करणे आणि तेथून पक्षाचा उमेदवार निवडून आणणे यासाठी प्रताप सरनाईक यांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
एकंदरीतच प्रताप सरनाईक यांना सरकारमध्ये भाजपशी सलोख्याचे संबंध ठेवून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, त्यासाठी त्यांना पक्षाकडूनही पाठबळ मिळणे गरजेचे आहे. शिवाय भाजपकडून शह-कटशहाचे राजकारण होऊ शकते, त्यामळे परिवहन मंत्री सरनाईक यांना भाजपशी दोन हात करतच शिवसेना वाढवावी लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.