

कारेगाव पंचायत समितीच्या निवडणुकीत निर्मला शुभम नवले यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी त्यांना तब्बल ३०० मतांनी मागे टाकत विजय मिळवला. निकालानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत नवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचा गंभीर आरोप केला.
निर्मला नवले म्हणाल्या की, ३०० मतांचा फरक हा धक्का देणारा आहे. तरीही ६५७७ मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. विकासाच्या मुद्द्यांवर लढवलेली ही निवडणूक शेवटी पैशांच्या आणि गैरप्रकारांच्या सावटाखाली गेली, याची खंत वाटते. मतं पैशाने विकत घेता येतात, पण लोकांचा विश्वास विकत घेता येत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
नवले यांनी निवडणुकीदरम्यान दारू आणि ड्रग्जचा वापर झाल्याचाही आरोप केला. त्यांच्या मते, काही ठिकाणी प्रचारासाठी कार्यकर्त्यांना जागवून ठेवण्यासाठी आणि अधिक काम करून घेण्यासाठी अमली पदार्थांचा वापर झाला. यामुळे गावातील ३० ते ४० तरुण व्यसनाच्या आहारी गेल्याचा दावा त्यांनी केला. ही बाब कोणत्याही राजकीय पराभवापेक्षा अधिक वेदनादायक असल्याचे त्या म्हणाल्या.
पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊनही हजारो मतदारांनी साथ दिली, याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र काही मतदार अल्प रकमेपायी फसले, ही भावना अस्वस्थ करणारी आहे. आजच्या राजकारणात कोण उमेदवार जास्त पैसे वाटतो, हा निकष ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“ही हार माझी नाही, तर मूल्यांची आहे,” असे म्हणत नवले यांनी आपला लढा थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. सामाजिक काम आणि विकासासाठीचा प्रयत्न पुढेही सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या मार्गदर्शक अजित पवार यांनी कधीतरी म्हटलेले “राजकारण खूप खराब आहे” हे शब्द आज प्रकर्षाने आठवत असल्याचे सांगताना त्यांचा आवाज दाटून आला.
पराभव स्वीकारत असतानाही संघर्षाची भूमिका कायम ठेवण्याचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. निवडणूक हरली असली तरी लोकांसाठी काम करण्याची जिद्द अजूनही तितकीच मजबूत असल्याचे त्यांनी शेवटी ठामपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.