
Pune, 08 August : देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी (ता. 15 ऑगस्ट) दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे राज्यातील 17 सरपंचांना पत्नीसह निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, तर सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील लोंढेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा समावेश आहे. या दोन्ही सरपंचांच्या कामांची विशेष दखल घेऊन त्यांना दिल्लीतील कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिन (Independence Day) आणि प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी विशेष काम करणाऱ्या सरपंचांना आमंत्रित केले जाते. सरपंच म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन या शासकीय कार्यक्रमाला निमंत्रण देऊन त्यांच्या कामाचा गौरव करण्यात येतो. लाल किल्ल्यावरील ध्वजवंदन कार्यक्रमासाठी पती पत्नीला आमंत्रित केले जाते.
येत्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला राज्यातील तब्बल 17 सरपंचांना आमंत्रित केले आहे, त्यात कोरेगाव भीमा (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ढेरंगे यांचा, तर सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील लोंढेवाडी येथील प्रमोद ऊर्फ संतोष लोंढे यांचा समावेश आहे. या दोन्ही सरपंचांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन हे आमंत्रण त्यांना देण्यात आलेले आहे.
कोरेगावचे सरपंच संदीप ढेरंगे हे ता. 12 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. ते दिल्लीत 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पंचायतराज मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत मार्गदर्शन, अनुभव कथन तसेच ध्वजवंदन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ढेरंगे हे दुसऱ्यांदा सरपंच झाले असून त्यांनी स्मार्ट कोरेगाव भीमा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरेगाव भीमाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ढेरंगे यांनी वनजमीन आणि सरकारी निधी मिळविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे. विविध मंत्रालयांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी निधी मिळविला आहे. संदीप ढेरंगे यांच्या राजकीय वाटचालीत खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी तथा माजी ग्रामपंचात सदस्या अंजली ढेरंंगे यांना दिल्लीतील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचरी संधी मिळणार आहे.
प्रमोद लोंढे हे 2010 पासून लोंढेवाडीचे नेतृत्व करत आहेत. गावाला स्वच्छ आणि 24 तास पाणी मिळावे, यासाठी सौरऊर्जेवर पाणी योजना राबविला आहे. त्यांनी सौर वॉटरहिटर बसवून ग्रामस्थांना गरम पाणी देण्याची नाविन्यापूर्ण योजना राबवली आहे. गावात तब्बल पाच हजार रोपे लावून असून लोंढेवाडी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.