

मोहोळ आणि आसपासच्या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी आमदार, त्यांच्या दोन मुलांसह एकूण २८ नेते आज (२९ ऑक्टोबर) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असून, या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत.
मोहोळमधून तब्बल दीड हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी ३६७ वाहनांतून मुंबईकडे रवाना झाले असून, भाजपच्या प्रदेश कार्यालयात सकाळी १० वाजता प्रवेश सोहळा आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.
या प्रवेशात प्रमुख नेते म्हणून राजन पाटील, यशवंत माने, बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह व विक्रमसिंह शिंदे आणि क्षीरसागर पिता-पुत्रांचा समावेश आहे, ज्यामुळे मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्यात भाजपची संघटना बळकट होणार आहे.
Solapur, 28 October : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी आमदार आणि एका माजी आमदाराच्या दोन पुत्रांसह तब्बल 28 जणांचा आज (ता. 29 ऑक्टोबर) भारतीय जनता पक्षात मुंबईत प्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेशाचा सोहळा होणार आहे. एकट्या मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे दीड हजार नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे 367 वाहनांतून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, मुंबईतील भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयातील पक्षप्रवेशाच्या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजपत प्रवेश केलेल्या नेत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) त्यांचे दोन्ही पुत्र विक्रांत व अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे दोन्ही पुत्र रणजितसिंह शिंदे व विक्रमसिंह शिंदे यांच्यासह २८ जणांचा समावेश असणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.मोहोळमधील शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर या पिता-पुत्रांची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे.
भाजपच्या स्थापनेपासून पक्षात सक्रीय
भाजपकडून नागनाथ क्षीरसागर यांनी १९९९ व २००४ अशी दोनवेळा पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून २००९ ची निवडणूक अपक्ष तर २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली होती. नागनाथ व सोमेश क्षीरसागर या पिता-पुत्रांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेकडून त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. ते जनसंघ आणि त्यानंतर भाजपच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय होते. त्यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी २०१७ मध्ये पेनूर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.
राजन पाटील-यशवंत मानेंच्या प्रवेशाचे स्वागत
मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील भाजप नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी या प्रवेशाचे स्वागत केले. मात्र, यामुळे जुन्या भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना केली. त्याबाबत दक्षता घेतली जाईल; कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे, सुशील क्षीरसागर, अंकुश अवताडे उपस्थित होते.
हे नेते कमळ हाती घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी, जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे, उपसभापती प्रशांत बचुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जालिंदर लांडे, सज्जन पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, ॲड. राजाभाऊ पाटील, कुंदन धोत्रे, माजी सभापती रत्नमाला पोतदार, ज्योत्स्ना पाटील, सिंधू वाघमारे, यशोदा कांबळे, राहुल मोरे, बाळासाहेब भोसले, विश्वजित पाटील.
1. या प्रवेश सोहळ्याची तारीख आणि ठिकाण काय आहे?
२९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
2. कोणते प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत?
राजन पाटील, यशवंत माने, बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह आणि विक्रमसिंह, तसेच नागनाथ व सोमेश क्षीरसागर.
3. या प्रवेशानंतर काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.
4. जुन्या भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीबाबत काय भूमिका घेतली गेली?
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.