
Satara, 06 September : जयकुमार गोरे यांच्याबरोबर माझं वैयक्तिक भांडण नाही, म्हणणारे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत ही काहीसे सबुरीचे धोरण घेतल्याचे दिसून येत आहे. फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना ‘आम्ही आता काय एकमेकांच्या कॉलरी धरायच्या का? ,’ असा प्रश्न उपस्थित करून रामराजेंनी रणजितसिंह यांच्यासोबतचा कडवा विरोध मवाळ केला की काय, अशी चर्चा रंगली आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar ) विरुद्ध जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर हा संघर्ष संपूर्ण राज्याला सर्वश्रूत आहे. या दोन्ही गटांसोबत रामराजेंचा टोकाचा संषर्घ झाला. पण विधानसभा निवडणुकीपासून रामराजे गट फलटणच्या राजकारणात बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेला अजित पवार यांच्याकडून तिकीट जाहीर करून रामराजेंनी ऐनवेळी दीपक चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीत उतरवले. त्या निवडणुकीत रामराजे गटाचे दीपक चव्हाण यांचा पराभव झाला. त्यांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणारे सचिन पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले.
दरम्यानच्या काळात महायुती सरकार सत्तेवर आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री झालेले जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक नेत्यांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतर पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर रामराजेंनी गोरे यांच्यासोबत वाद मिटल्याचे संकेत दिले होते.
‘जयकुमार गोरे आणि माझं काही वैयक्तिक भांडण नाही. मीच सगळं करतो, असं त्यांच्या मनात आहे. गोरे यांच्या मनात माझ्याविषयी जी अढी निर्माण झाली आहे त्याविषयी मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे, योग्य वेळी सांगेन,’ असे सांगून नाईक निंबाळकर यांनी गोरे यांच्यासोबत प्रथमच मवाळ भाषेचा वापर केला होता. त्यावेळीच गोरे आणि रामराजेंमध्ये पॅचअप झाल्याची चर्चा सुरू झाली होती.
एकीकडे गोरे यांच्यासोबत वाद मिटल्याचे संकेत देणारे रामराजे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबतही काहीसे मवाळ धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘रणजितसिंह आणि आमच्यात संघर्ष आहे. पण, आता तुमची काय अपेक्षा आहे, आम्ही काय एकमेकांच्या कॉलरी धरायच्या का? कुठे थांबायचं, हे आम्हा दोघांनाही चांगलं कळतं, असे विधान रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.