

Solapur, 25 April : करमाळा तालुक्यातील आपले साम्राज्य उभारणाऱ्या मनोज ऊर्फ मनोहरमामा भोसले याला फसवणूक प्रकरणी दुसऱ्यांदा अटक झाली आहे. बेरोजगार असलेल्या मनोहर भोसलेने आपल्याला बाळूमामा प्रसिद्ध आहेत, दुर्धर आजार बरे करतो, असे सांगून तो लोकांची फसवणूक करायचा. त्याच्याकडे अनेक राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांसह प्रशासनातील उच्चस्पद अधिकारी, सिनेसृष्टीतील लोकांचा सतत राबता असायचा.
बारामतीमधील एका रुग्णाच्या फसवणूक प्रकरणी २०२१ मध्ये त्याला अटक झाली होती. त्यानंतर बाहेर आलेल्या मनोहरने करमाळा तालुक्यातील उंदरगावचा मठ बंद करून तालुक्यातील घोटी येथे तब्बल २२ एकरांवर आश्रम उभारून आपले फसवणुकीचे दुकान जोमाने सुरू केले होते. मध्यंतरी एक बडा निवृत्त अधिकारी हेलिकॉप्टर घेऊन घोटीच्या आश्रमात आल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्याने समृद्धी महामार्गाच्या उभारणीत महत्वाची भूमिका निभावली होती.
आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एका उद्योजकाला पूजा करावी लागेल, असे सांगून अडीच लाख रुपयांची माागणी मनोहर भोसले याने केली होती. सोलापुरातील गौतम कसबे यांनी या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती, त्यानुसार पुणे पोलिसांनी मांजरीतून मनोहर भोसले याला अटक केली आहे.
मनोहर भोसले हा मूळचा इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा आहे. डीएड परीक्षा नापास झाल्यानंतर बाजारात बोंबील विकून उदरनिर्वाह करायचा. पण तो एक दिवस अचानकपणे गायब झाला. काही दिवसांनंतर तो उंदरगावात प्रकट झाला आणि आपल्याला बाळूमामा प्रसन्न असल्याचे सांगू लागला. तो बंगालमध्ये जाऊन काळी जादू शिकून आल्याचे बोलले जाते.
‘ब्लॅक मॅजिक’ मुळे तो नागरिकांना त्यांच्या भूतकाळातील विविध गोष्टी सांगायचा, त्यामुळे त्याने लोकांचा विश्वास हळूहळू संपादन केला. लोकांची गर्दी वाढत गेली, तसे मनोहरमामाचे साम्राज्यही वाढत गेले. विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमेला त्याच्याकडे मोठी गर्दी असायची. त्याने सुरुवातीला उंदरगावात मठ उभारला होता. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रदेश पातळीवरील एक बडा नेता गुपचूप दर्शनासाठी आला होता. त्यानंतर मनोहर भोसले हा प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
सिरियअलमध्ये काम मिळवून देतो, म्हणून मनोहर याने एका महिलेवर २०२१ मध्ये अत्याचार केला होता. तसेच आर्थिक फसवणूक केली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मनोहरला अटक करण्यात आली होती. पण जामिनावर सुटलेल्या मनोहरने पुन्हा आपला धंदा जोरात सुरू केला होता. कॅन्सर व इतर आजार बरे करतो म्हणून बारामती आणि दौंडमधील रुग्णांची फसवणूक केली होती. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच उंदरगावचा मठही बंद करण्यात आला होता.
या गुन्ह्यातून जामिनीवर बाहेर आलेल्या मनोहर भोसले याने करमाळा तालुक्यातील घोटी या गावातच तब्बल २२ एकर जमिनीवर मठ उभारला आहे. उंदरगावसह घोटी येथील मठातही अनेक सेलिब्रिटीज, राजकीय नेते आणि बड्या अधिकाऱ्यांची ये-जा असायची.
समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावणारा बडा अधिकारी मध्यंतरी हेलिकॉप्टर घेऊन मनोहरमामाकडे आल्याची माहिती आहे. तसेच, सिनेसृष्टीतील अनेकजण त्याच्याकडे यायचे, त्यामुळे मनोहरमामा स्वतःच मोठा सेलिब्रिटीज बनला होता. मात्र, उद्योजकाच्या फसवणूक प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.