Abhijeet Patil : विठ्ठल परिवाराच्या बैठकीनंतर सूत्रं फिरली अन्‌ अभिजीत पाटलांनी रात्रीतच मुंबई गाठली...

Pandharpur Political News : विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून माजी आमदार प्रशांत परिचारकांच्या पंढरपूर नगरपरिषदेतील सत्तेला आव्हान देण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, सूत्रं फिरली आणि आमदार अभिजीत पाटील मुंबईला रवाना झाले. त्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसून येत आहे.
Abhijeet Patil
Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. विठ्ठल परिवार एकत्र आला, पण..:
    पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी विठ्ठल परिवाराने प्रणिता भगीरथ भालके यांच्या रुपाने तगडा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला, मात्र सूत्र फिरली आणि अभिजीत पाटील यांना मुंबईला जावे लागले.

  2. मुंबईतील ‘बैठक’ आणि बदललेली भूमिका:
    आमदार पाटील यांच्या मुंबई भेटीनंतर त्यांची भूमिका अचानक बदलली, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भालकेंसोबत जाण्यास विरोध केला.

  3. भाजपशी वाढलेले संबंध आणि राजकीय गणित:
    पाटील यांच्या साखर कारखान्यांना सरकारकडून २६७ कोटींच्या कर्जाची थकहमी मिळाल्याने त्यांचे भाजपकडे झुकते माप असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Solapur, 12 November : पंढरपूरच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावणारी विठ्ठल परिवार नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आला. परिवाराच्या प्रणिता भगीरथ भालकेंच्या माध्यमातून तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पंढरपुरातील सत्तेला सुरुंग लावण्याची संपूर्ण तयारी झाली. त्यासाठी खुद्द आमदार अभिजीत पाटील यांनी पुढाकार घेतला. तोच मेसेज थेट मुंबईपर्यंत गेला आणि सूत्रं फिरली. ज्या दिवशी विठ्ठल परिवाराची बैठक झाली, त्याच दिवशी मुंबईतून निरोप आला आणि आमदार अभिजीत पाटील यांनी मध्यरात्रीच मुंबई गाठल्याची चर्चा आहे. त्यानंतर आमदार पाटील हे विठ्ठल परिवाराच्या बैठकांपासून लांब राहिल्याचे दिसून आले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी पंढरपूर नगरपरिषदेवर सत्ता मिळविण्याचा चंग बांधला. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले. त्यासाठी त्यांनी विठ्ठल परिवाराला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून पंढरपुरात विठ्ठल परिवार एकत्र आला. मात्र त्याच ठिकाणी माशी शिंकली.

विठ्ठल परिवारातील (Vitthal Parivar) नेत्यांची हॉटेल ग्रॅंडमध्ये दहा दिवसांत दोन वेळा बैठक झाली. त्यानंतर कल्याणराव काळेंच्या कार्यालयात आमदार अभिजीत पाटील, भगीरथ भालके आणि काळेंच्या उपस्थितीत बैठक झाली आणि प्रणिता भालके यांची उमेदवारी निश्चित झाली. एकीकडे विठ्ठल परिवार एकत्र येत असताना दुसरीकडे भाजपकडून सूत्रं हलवली जात होती.

ज्या आमदाराला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, असे भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी सांगितले होते. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असणारा आमदार भाजपच्या विरोधात काम करत आहे, असे मेसेज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि आमदार अभिजीत पाटील यांनी मध्यरात्रीच मुंबई गाठली.

Abhijeet Patil
Dilip Mane : भाजपने वेटिंगवर ठेवलेल्या दिलीप मानेंना अजितदादांच्या राष्ट्रवादीची ‘ऑफर’

मुंबईहून परतल्यानंतर आमदार पाटील यांची भाषाच बदलली. त्यांनी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही भालकेंसोबत जाण्यास विरोध दर्शविल्याची माहिती आहे. त्यानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी आपला कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो निर्णय देईल, त्यानुसार आपण काम करू, असे सांगायला सुरुवात केली.

मुंबईच्या भेटीनंतर पंढरपुरात भाजप इच्छुकाच्या मुलाखती घेण्यासाठी आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीही आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेतल्याचे पुढे आले. एकंदरितच मुंबई दौऱ्यानंतर अभिजीत पाटील हे विठ्ठल परिवारापासून दुरावत असल्याचे चित्र आहे. त्याला काही कारणं आहेत.

Abhijeet Patil
NCP SP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा मोठा धक्का; शहरावर वर्चस्व असलेला कोठे परिवार भाजपत दाखल

लोकसभा निवडणुकीच्या वेळी विठ्ठल कारखाना सील केल्यानंतरही अभिजीत पाटील यांनी भूमिका बदलली होती. भाजपला पाठिंबा देताच कारखान्याचे सील काढण्यात आले होते. तसेच सरकारने नुकतेच विठ्ठल कारखान्याच्या २६७ कोटींच्या कर्जाला थकहमी दिली आहे. पंढरपूरसह धाराशिव व इतर ठिकाणी असलेल्या पाटील यांच्या कारखान्यांचे आर्थिक गणित भाजप नेत्यांच्या मदतीवर अवलंबून असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे अभिजीत पाटील यांच्या बदलेल्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Q1: विठ्ठल परिवार म्हणजे कोण?
A1: पंढरपूरच्या राजकारणावर प्रभाव असलेले भालके, पाटील, काळे आदी नेत्यांचे गट.

Q2: प्रणिता भालके कोण आहेत?
A2: भगीरथ भालके यांच्या पत्नी, आणि पंढरपूर नगरपरिषदेसाठी संभाव्य उमेदवार.

Q3: आमदार अभिजीत पाटील मुंबई का गेले?
A3: त्यांच्या भालकेंशी युतीच्या निर्णयाच संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर अभिजीत पाटील तातडीने मुंबईत गेले.

Q4: त्यांची भूमिका का बदलली?
A4: भाजपशी असलेल्या संबंधांमुळे त्यांनी भालकेंपासून अंतर घेतले, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com