भुईंज : सुरूर (ता. वाई) येथील स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीवर अंधश्रद्धेतून अघोरी पूजा करणाऱ्या सहा जणांना भुईंज पोलिसांनी हडपसर (पुणे) येथून अटक केली आहे. राहुल राजेंद्र भोसले, नितीन लक्ष्मण चांदणे, विशाल बाबासाहेब चोळसे, सुमन बाळासाहेब चोळसे, सुशीला नितीन चोळसे, केसर लक्ष्मण चांदणे (सर्व रा. बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी हडपसर पुणे येथून आलेल्या तीन महिला व तीन पुरुष दुपारी बारा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान सुरूर येथील स्मशानभूमीत हळदी, कुंकूचे गोलाकार रिंग करून त्यावर अल्पवयीन मुलीच्या मांडीवर जिवंत कोंबडा ठेवून मृतदेह जाळण्याच्या ठिकाणी अग्नी पेटवून अघोरी विद्येचा प्रयोग करीत होते. ती सर्व परिस्थिती पाहता हा नरबळीचा प्रकार आहे की काय, अशी शंका तेथील जागरूक नागरिक व युवकांना आल्याने त्यांनी त्यांचा व्हिडिओ काढून व्हायरल केला.
त्यांना त्याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीचा उत्तरे देऊन तेथून पलायन केले होते. दरम्यान, संबंधित युवकांपैकी विवेक चव्हाण याने भुईंज पोलिसात अनोळखी तीन महिला व तीन पुरुष हे सुरूर येथे अंधश्रद्धेतून लहान मुलीवर अघोरी पूजा करीत असल्याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी त्वरित हालचाल करून काल रात्रीच पुणे येथे संशयितांची शोध मोहिम राबवून त्या महिला व पुरुषांना ताब्यात घेतले.
संबंधित मुलीला चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले. राहुल राजेंद्र भोसले, नितीन लक्ष्मण चांदणे, विशाल बाबासाहेब चोळसे, सुमन बाळासाहेब चोळसे, सुशीला नितीन चोळसे, केसर लक्ष्मण चांदणे (सर्व रा. बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर रामटेकडी हडपसर, पुणे) यांना भुईंज येथे आणून आज सकाळी अटक करण्यात आले. आज त्यांना न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक निवास मोरे तपास करीत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.