
Ahmednagar News : पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटामधील आरोपींना शस्त्र पुरविल्याच्या आरोप असलेला असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार (रा. वार्ड नंबर २, ता. श्रीरामपूर) याला प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी दोन वर्षांसाठी पाच जिल्ह्यातून तडीपार केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा प्रशासनाने कुख्यात गुंडांविरोधात कारवाईचा बडगा सुरू केला असून, ही पहिली कारवाई झाली. (Latest Marathi News)
बंटी जहागीरदार याला अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून बंटी जहागीरदाराविरोधात तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आला होता. प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी या प्रस्तावावर सुनावणी घेतली. यात भिवंडी, मनमाड, नेवासा, श्रीरामपूर शहर, डेक्कन (पुणे) आणि मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याची दखल घेऊन अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपारीचा आदेश प्रांताधिकारी यांनी काढला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी काढलेल्या तडीपारीचा आदेश अलीकडच्या काळातील सर्वात मोठा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा प्रशासनाने कुख्यात गुंडांविरोधात कारवाईचा बडगा सुरू केल्याचे दिसते आहे. यात ही पहिलीच मोठी कारवाई केल्याने नगर जिल्ह्यातील गुंड सैरभैर झाले आहेत.
बंटी जहागीरदार हा 1997 पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय आहे. त्याच्याविरोधात 2002 मध्ये पहिली तडीपारीची कारवाई झाली. तो त्यानंतर मुंबई येथे गेला. तिथे त्याचे गुन्हेगारीविश्वाशी संबंध जोडले गेले. भिवंडी मधील पडघा ग्रामपंचायत सदस्य अब्दुल सत्तार गुजर याच्या हत्या प्रकरणात त्याचा सहभाग आढळला. यात त्याला 2003 मध्ये अटक झाली. सिमीचा हस्तक व गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील साकीब नाचन हा या हत्येचा सूत्रधार होता. तसेच, साकीब नाचन हा गुजरात मुस्लिम रिव्हेंज फोर्सचा सक्रिय सदस्य होता. पुढे गुजर खून खटल्यात बंटी जहागिरदार निर्दोष सुटला. तसेच भिवंडी बजरंग दलाचे अध्यक्ष ललित जैन यांच्या हत्या प्रकरणातही त्याचा सहभाग असावा, असा संशय आहे.
या नंतर बंटी जहागीरदार याला संरक्षण दलाशी निगडीत असलेल्या कागदपत्रासह २००६ मध्ये मनमाड पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्याबरोबर आरिफ हबीब लखानी हा देखील होता. यावेळी या दोघांकडून एक सीडी देखील जप्त करण्यात आली होती. संरक्षण दलाची ही माहिती हे दोघे पाक दुतावासाला पुरविणार असल्याचा संशय दहशतवाद विरोधी पथकाला संशय होता. नेवासे (जि. नगर) येथील पंचायत समिती सदस्य अण्णा लष्करे याच्या हत्येनंतर बंटी जहागीरदारची चौकशी झाली होती. श्रीरामपूरमधील भाजपचे प्रकाश चित्ते यांच्या हत्येच्या सुपारी प्रकरणात देखील त्याचा सहभाग पोलिसांना आढळला आहे.
बंटीच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणेचे नेहमीच लक्ष राहिले आहे. यापूर्वी त्याच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविले आहेत. बंटी हा खतरनाक गुन्हेगार असून त्याचा देशद्रोही कारवायांमध्ये सहभाग आढळून आला आहे. पुणे येथील साखळी बाॅम्बस्फोटात तो १० जानेवारी २०२३ पासून जामिनावर बाहेर आहे. बंटी जहागीरदारचे साम्राज्य विस्तारलेले आहे. गोदावरी नदीपात्रातून कोटय़वधी रुपयांच्या वाळूचा बेकायदा उपसा त्याने केला.
श्रीरामपूरसह अनेक भागात त्याने भूखंड खरेदी-विक्रीच्या व्यवहारात त्याने गुंतवणूक केलेली आहे. गुन्हेगारी कृत्यांमध्ये माहीर असलेल्या बंटी जहागीरदार याचे स्वतःचे सिंडीकेट असल्याचे सांगितले जाते. त्याच्या सिंडीकेटमधील गुन्हेगारांना पोलीस कारवायांपासून वाचवण्यासाठी देखील यंत्रणा कार्यरत आहे. काही ठिकाणी त्याला राजकीय पाठबळ देखील मिळताना दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.