
Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 30 डिसेंबर रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर काल (20 डिसेंबर) महासभा झाली. परंतु ही सभा वेगळ्याच मुद्याने गाजली. नगर रचना विभागात घराच्या कम्प्लिशन सर्टीफिकेटसाठी दोन-दोन लाख रुपये मागतात. नगरसेवकांकडे गेल्यास जास्त पैसे लागतील, असा दमही देतात. नगर रचनामधील या गैरप्रकारावर नगरसेवकांनी सभागृहात प्रशासनाला अक्षरश: धारेवर धरले. (Latest Marathi News)
महापालिकेच्या आताच्या कार्यकाळातील अखेरची महासभा बुधवारी झाली. येत्या 30 डिसेंबरला नगरसेवकांची मुदत संपणार आहे. त्यामुळे या महासभेत नगरसेवकांनी नागरी सुविधांवर आक्रमक भूमिका घेतली. तसेच नगर रचना विभागातील गैरप्रकारांना वाचा फोडली. घराच्या कम्प्लिशन सर्टीफिकेसाठी तेथील कर्मचारी दोन-दोन लाख रुपये मागतात. नगरसेवकांकडे गेल्यावर काम होणार नाही, असे ते सांगतात. हे काय फुकट काम करतात का? किती पगार आहेत यांना? असा सवाल विरोधी पक्षनेते संपत बारस्कर डॉ. सागर बोरुडे, कुमार वाकळे यांनी महापालिकेच्या अखेरच्या महासभेत केला.
नगर रचनामध्ये हे काय प्रकार सुरू आहेत? आम्ही खपवून घेणार नाही. तेच तेच लोक टाऊनप्लॅनिंगमध्ये कसे असतात?, असा जाबही यावेळी विचारण्यात आला. नगर रचना सहायक संचालक राम चारठाणकर यांनी, चुकीच्या पध्दतीने कुणी सांगत असेल व काही मागणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली होईल, असे आश्वासन सभागृहात दिले.
महासभेस आयुक्त डॉ. पंकज जावळे तब्बल 20 मिनिटे उशिरा आले. त्यावरून सभेच्या सुरुवातीला गोंधळ झाला. सभा थांबवण्याची मागणी नगरसेवकांनी केली. पण आयुक्त आल्यावर गोंधळ थांबला. त्यानंतर नगर रचना विभागातील लुटालूट, पथदिवे व अन्य विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. राम चारठाणकर यांच्या हाताखालील कर्मचारी नालायक आहेत, बिल्डरच्या घरी बसतात. नगरसेवकांना चुकीची उत्तरे देतात, असा दावा कुमार वाकळे यांनी केला.
पथदिव्यांचे थर्ड पार्टी ऑडिट व कामे ठप्प आहेत. मटेरियल नाही, असा दावा डॉ. सागर बोरुडे यांनी केला, तर नवीन पथदिवे का बसवले जात नाहीत, असा सवाल बाळासाहेब बोराटे यांचा होता. अभियंता बल्लाळ यांनी थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण झाले असल्याचे सांगितले. मात्र, विद्युत विभाग प्रमुख, संबंधित उपायुक्त व तेथील कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी बारस्कर यांनी केली.
अमरधाम, कब्रस्तानमध्ये तरी दिवे लावा. पथदिव्यांचे टेंडर बोगस झाले आहे. काही ठेकेदार काम करत नाही. एक महिन्यात प्रश्न मार्गी लागेल, असे आयुक्त म्हटले होते. याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी वाकळे यांनी केली. उजेडच पडत नाही, स्पॉट लाईट की स्ट्रीट लाईट, असा सवाल नगरसेवक योगीराज गाडे यांचा होता. यावर येत्या 23 तारखेला पथदिवे दुरुस्ती सुरू होईल, अशी ग्वाही अभियंता कोके यांनी दिली.
सगळ्या ओपन स्पेसवर अतिक्रमण झाले, आम्ही कारवाई करायला सांगितली की, आमची नावे त्यांना सांगतात. 31 तारखेनंतर लोक ज्या दिवशी आमच्याकडे येतील, त्या दिवशी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना ठोकून काढणार, काय गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ द्या, असा इशारा कुमार वाकळे यांनी दिला. महापालिकेची मुदत संपत असल्याने आता नगरसेवक असलेल्या सर्व 73 सदस्यांचा एकत्रित फोटो काढून महापालिकेत लावा व नवीन प्रथा सुरू करा. प्रत्येक पंचवार्षिकचा असा एक फोटो सभागृहात पाहिजेच, अशी मागणी यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.