Matoshree Sugar Factory: शेतकऱ्यांची एकजूट पाहून पोलिसांनी काढता पाय घेतला...

Solapur News Farmers protest Congress Bhavan: अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर काराखान्याने उसाचे बिल द्यावे, यासाठी उमरगा, निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलापूर येथील काँग्रेस भवनसमोर उपोषण सुरू केले आहे.

Matoshree Sugar Factory
Matoshree Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

मायबाप सरकार, तुमच्या राज्यात काय चालले आहे? रानात घाम गाळून शेतकऱ्यांनी ऊस पिकवायचा, तो कारखान्याला घालायचा आणि कारखान्याने बिल द्यायचे नाही! कारखान्याने बिल द्यावे यासाठी उसाचे बिल मिळावे म्हणून शांततेत आंदोलन करणारे शेतकरी तुम्हाला सहन होत नाहीत का? आंदोलनस्थळावरून हुसकावून लावण्यासाठी आलेल्या पोलिसांना शेतकऱ्यांची एकजूट पाहून काढता पाय घ्यावा लागला.

उमरगा (जि. धाराशिव) परिसरासह शेजारच्या लातूर जिल्ह्यातील शेतकरी सोलापूर येथे आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांनी अक्कलकोट येथील मातोश्री साखर कारखान्याला ऊस दिला आहे. आठ महिने झाले तरी या कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे बिल दिलेले नाही.

कारखान्यावर हेलपाटे मारून शेतकरी थकले, मात्र त्यांची दखल कुणीही घेतली नाही. शासकीय यंत्रणांनीही शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे जवळपास 300 शेतकऱ्यांनी सोलापूर येथील काँग्रेस भवनसमोर उपोषण सुरू केले आहे. हा कारखाना काँग्रेसच्या नेत्याचा असल्याने हे स्थळ निवडण्यात आले आहे.

बुधवारी सकाळपासून शेतकऱ्यांनी सोलापूरच्या काँग्रेस भवनसमोर उपोषण सुरू केले. त्यांना ठोस आश्वासन मिळाले नाही. आता आश्वासन मिळाले तरी शेतकऱी त्यावर विश्वास ठेवतील का, असा प्रश्न आहे, कारण गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी हेलपाटे मारत आहेत.

दिवस मावळेल तशी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार वाढत गेली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. या आंदोलनात शेतकरी संघटनाही सहभागी आहे. प्रशासनाने काही शेतकऱ्यांशी चर्चा केली, मात्र तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रशासनाने अखेरचा पर्याय म्हणून पोलिसांना आंदोलनस्थळी पाठवले, मात्र शेतकऱ्यांची एकजूट पाहून पोलिसांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.


Matoshree Sugar Factory
Babanrao Shinde: निवडणूक न लढण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदाराला धक्का? दोन कट्टर समर्थकांनी साथ सोडली!

शेतकऱ्यांनी याबाबत साखर सहसंचालकांना निवेदन दिले आहे. या निवेदनात शेतकऱ्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. उसाचे बिल मागण्यासाठी हे शेतकरी काही दिवसांपूर्वी कारखान्याच्या सोलापूर येथील कार्यालयात गेले होते. त्यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत अरेरावी केली होती, शिवीगाळ केली होती.

बिल देणार नाही, काय करायचे ते करा, अशी धमकीही दिली होती, शेतकऱ्यांना हाकलून लावले, असे निवेदनात म्हटले आहे. काही शेतकऱ्यांनी प्रतिटन 500 ते 1000 रुपयांप्रमाणे बिल देण्यात आले आहे. उर्वरित रकमेसाठी कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना सतत तारखा दिल्या, बिल मात्र दिले नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ऊस हे शेतकऱ्यांना हमखास पैसे मिळवून देणारे नगदी पीक आहे. विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना रात्री -बेरात्री पाणी देऊन ऊस जगवावा लागतो. ऊस वाढवण्यासाठी मोठा खर्चही करावा लागतो. अशा अडचणी असल्या तरी नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा कल उसाच्या लागवडीकडे असतो. परिणामी उसाचे क्षेत्र वाढले आहे.


Matoshree Sugar Factory
Satej Patil: सतेज पाटलांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा बॉम्ब फोडला

धाराशिव जिल्ह्यातील काही कारखाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहेत. या कारखान्यांनी ठरलेल्या वेळेत शेतकऱ्यांना त्यांचे बिल अदा केले आहे. या कारखान्यांना सभासदांचाच ऊस पुरेसा ठरत असल्याने अन्य शेतकऱ्यांची अडचण होते. अशा परिस्थितीत मग बाहेरच्या कारखान्यांना ऊस पाठवावा लागतो. त्यामुळेच शेतकऱ्यांनी अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याला ऊस दिला होता.

आता सणासुदीचे दिवस आले आहे. दोन दिवसांत गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यानंतर लागलीच महालक्ष्मींचे आगमन होईल. त्यापाठोपाठ दसरा, दिवाळी आहेच. या शेतकऱ्यांची सर्व आर्थिक गणिते उसाच्या बिलापोटी मिळणाऱ्या रकमेवर अवलंबून होती. ती सर्व गणिते विस्कळीत झाली आहेत.

काही शेतकऱ्यांनी या पैशांच्या आशेवर घरात लग्नकार्य जमवले होते, मात्र पेसे वेळेत न मिळाल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांचे जगणे वाटते तितके सोपे नसते. अशा परिस्थितीमुळे त्यांना उसनवारी करावी लागते, खासगी सावकारांच्या दारात जावे लागते आणि पर्यायाने कर्जाचा डोंगर वाढत जातो.

हे सर्व सुरू असताना सरकार काय करत आहे, सरकारचे सोलापुरातील प्रतिनिधी काय करत आहेत? घरदार सोडून हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शंभर- दीडशे किलोमीटरवरून येऊन ज्या काँग्रेस भवनसमोर शेतकरी बसले आहेत, त्या काँग्रेसचे नेते काय कारत आहेत?, असे अक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शेतकऱ्यांनी यापूर्वीही निवेदने दिली होती. त्याचवेळी साखर संचालक कार्यालयाने कठोर पावले उचलली असती तर शेतकऱ्यांची इतकी त्रेधातिरपट उडाली नसती. बिल मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. मायबाप सरकार सणासुदीच्या काळात तरी आपल्या कष्टाचे पैसे मिळवून देणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com