Mohol, 27 July : अनगर येथील अतिरिक्त तहसील कार्यालयाच्या विरोधाच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात एकवटले आहेत. अतिरिक्त तहसील कार्यालय अनगर येथे मंजूर करण्यात आल्याने मोहोळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
या बंदमध्ये स्वपक्षातील उमेश पाटील यांच्यापासून भाजप नेते विजयराज डोंगरे, शिवसेनेच्या सीमा पाटील, दीपक गायकवाड, वंचितचे रमेश बारसकर, शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर, शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, माजी उपसभापती मानाजी माने हेही सहभागी झाले होते.
मोहोळ येथील तहसील कार्यालयाचे विभाजन होऊन राजन पाटील (Rajan Patil) यांचे गाव असलेल्या अनगर येथे अतिरिक्त तहसील कार्यालय (Additional Tehsil office) होणार आहे. या अतिरिक्त तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात चार मंडलातील 43 गावांचा समावेश असणार आहे. यामध्ये नरखेड, शेटफळ आणि पेनूर या मंडलांचा समावेश आहे. याच मंडलातील नेत्यांचा राजन पाटील यांना विरोध आहे. त्यामुळे या मंडलातील नेत्यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्याने आज मोहोळ येथे कडकडीत बंद पाळला.
अनगर येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर केल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा या बंदमध्ये निषेध करण्यात आला. आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार सचिन मुळीक यांना सर्वपक्षीयांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सीमा पाटील यांनी ‘येत्या 15 ऑगस्टच्या एक दिवस अगोदर महिलांसाठी ग्रामसभा असते, त्यात हे कार्यालय सुरू होऊ नये,’ असा ठराव करण्याचे आवाहन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक गायकवाड म्हणाले, मोहोळच्या सहकार्यासाठी सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे.
आजी माजी आमदारांनी ताकद पणाला लावून अतिरिक्त तहसील कार्यालय अनगरला नेले आहे. हा प्रतिष्ठेचा विषय झाला असून खरी कसोटी उमेश पाटील, विजयराज डोंगरे आणि मानाजी माने यांची लागणार आहे. अनगरच्या अतिरिक्त तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल; अन्यथा मोहोळचा आमदार बदलावा लागेल, असा इशारा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिला.
अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, बनावट कागदपत्रे तयार करून अतिरिक्त तहसील कार्यालयाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुय्यम निबंध कार्यालयाच्या वेळी गोंधळ झाला होता, त्यामुळे या कार्यालयाच्या आदेशापर्यंतची सर्व शासकीय प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. आपल्यामध्ये एकी नसल्याचा हा परिणाम आहे. गावागावांतून ठराव करा, जो सरपंच ग्रामसेवक ठराव देत नाही, त्याच्या विरोधात समितीकडे तक्रार करा.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर यांनी ‘विरोधकांमध्ये दुफळी निर्माण करून अनगरकरांनी आजपर्यंत राजकारण केले आहे. गावागावात सर्वपक्षीय समिती स्थापन करून ग्रामसभेत अतिरिक्त तहसील कार्यालयाचा रद्द करण्याचा ठराव करा,’ असे आवाहन केले.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनीही राजन पाटलांवर शरसंधाण साधले. गावात कोणी विरोध केला तर त्याला फोडून काढू. अनगर अतिरिक्त तहसील कार्यालय मजूर करणाऱ्या महसूलमंत्र्यांचा निषेध करत त्यांनीच मोहोळवर हे संकट आणले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर ते हा निर्णय नक्की रद्द करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता महसूल मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी स्पष्ट केले.
मोहोळ तालुक्याचे नाव पुसण्याचा विडा या दोघा आजी-माजी आमदारांनी उचलला आहे. अवघी तीनच मंडले या अतिरिक्त तहसील कार्यालयात कशी समाविष्ट करण्यात आली. त्यांचा हा राजकीय डाव हाणून पाडू, असा इशारा माजी उपसभापती मानाजी माने यांनी दिला. या वेळी उद्धव ठाकरे गटाचे महेश देशमुख, शरद पवार गटाचे लिगल सेलचे अध्यक्ष ॲड पवन गायकवाड, भाजपचे संतोष पाटील, माजी नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी आपल्या भावना मांडल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.