
Solapur, 11 August : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची उभारणी करताना औदुंबरअण्णा पाटील हे आमदार होते. अण्णांच्या वतीने यशवंतभाऊ पाटील, सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक), वसंतदादा काळे यांनी गावोगावी जाऊन कारखान्यासाठी काम केले. पंढरपूर तालुक्यात औद्योगिक क्रांती व्हावी. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, अशी त्यांची अपेक्षा हेाती. काही कारणांमुळे मतभेद झाले. त्यानंतर मोठ्या मालकांनी परत विठ्ठल कारखान्याच्या राजकारणात भाग घेतला नाही, अशी आठवण माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितली.
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कार्यक्रमात बोलताना माजी आमदार परिचारक यांनी तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास सांगितला. ते म्हणाले, विठ्ठल सहकारी साखर कारखाना उभारताना सर्व नेतेमंडळी एकत्र होते. मात्र, पुढे मतभेद झाल्यानंतर सुधाकरपंत परिचारक ( Sudhakarpant Paricharak मोठे मालक) यांनी विठ्ठलच्या राजकारणात भाग घेतला नाही. तुमची संस्था आहे, तुम्ही चालवा, मी दुसरी संस्था काढून चालवतो. अशी भूमिका त्यावेळी या नेतेमंडळींची होती.
दुर्दैवाने, कल्याणराव आता सगळंच बिघडलंय, कुणाला नावं ठेवायची, असा प्रश्न आहे. तुम्ही चांगलं वागा, असं सांगण्यापेक्षा आपण कसं वागायचं हेच ठरवायचं. आता तर आठ, पंधरा दिवसांत येऊन नेते हेात असतील तर कधी कधी वाटतं हे 365 दिवस कशाला घासायचं. पण सगळंच बिघडलंय, असं नाही. कुठंतरी चांगलं आहे, सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ काम झालं पाहिजे, अशी अपेक्षाही प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, मी आणि राजूबापू पाटील यांनी युवक काँग्रेसमध्ये जवळपास 15 वर्षे एकत्र काम केले. औदुंबरअण्णा पाटील, यशवंतभाऊ पाटील, सुधाकरपंत परिचारक ही एक पिढी होती. त्यांचे काम करत असताना वैचारिक मतभेद झाले. पण, त्या मतभेदाचे रुपांतर त्यांनी मनभेदामध्ये कधी होऊ दिलं नाही. आता कल्याणरावांनी आजच्या राजकारणाचा उल्लेख केला. पण, मी तालुक्याचं मागील राजकारण बघितलेले आहे.
सुधाकरपंत परिचारक हे आमदार होते, तरीसुद्धा हे सर्व नेतेमंडळी मुंबईत मालकांच्या खेालीवर असायचे. आमदारकी एकमेकांच्या विरोधात लढले. पण मुंबईत गेल्यावर मोठ्या मालकांच्या खोलीवर असायचे. ते एकमेकांना तुम्ही कॉटवर झोपा, मी खाली झोपतो, असा आग्रह करायचे. असा राजकीय प्रगल्भपणा जुन्या नेत्यांनी सांभाळला, अशी आठवणही परिचारक यांनी सांगितली.
प्रशांत परिचारक म्हणाले, यशवंतभाऊ पाटील, सुधाकरपंत परिचारक हे औदुंबरअण्णा आले की उठून उभे राहायचे. एक आदर त्यांच्याबाबत असायचा. त्यांच्यात वैचारिक मतभेद असू शकतात. पण एक माणूस, नेते म्हणून त्यांनी आमच्यावर संस्कार केले, त्या संस्कारामध्ये आम्ही आजही आहोत.
एकमेकांशी सन्मानाने बोललं पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. सत्ता, पद येतात आणि जातात. सत्ता हे आयुष्याचे शेवटचे साध्य नाही. ते एक साधन आहे. आपण समाजकारण, राजकारण स्वीकारले ते निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर समाजकारण, हीच भूमिका जुन्या पिढीनं घेतली. सुडाचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही, असेही परिचारकांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.