
Karad News : चंद्रहार पाटील यांनी स्वतःच्या मर्जीने शिवसेनेत प्रवेश केला आहे. बेइमानीची व्याख्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला शिकवावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठी बेइमानी उद्धव ठाकरे यांनी केली. संजय राऊत त्याचे मूळ आहेत. 2019 मध्ये निवडणुकीत आमच्यासोबत राहून निवडणूक लढवली, मते घेतली अन् पद, सत्ता व स्वार्थासाठी बेइमानी केली. त्यामुळे 'बेइमान ऑफ द महाराष्ट्र' हा अवॉर्ड उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) द्यावा लागेल, अशी टीका सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज येथे केली.
सातारा येथील कार्यक्रमाला रवाना होण्यासाठी मंत्री शेलार हे मुंबईतून विमानाने कऱ्हाड (जि.सातारा) येथील विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर चंद्रहार पाटील यांच्या पक्ष प्रवेशावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील झाडे तोडल्याबद्दल ट्विट करून कंत्राट देण्याबाबत शंका व्यक्त केली आहे.
त्यावर भाजप मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, ‘‘आदित्य ठाकरे आकसाने, चुकीची माहिती घेऊन झाडांच्या कापणीबाबत विषयांतर करण्यासाठी बोलत आहेत. मुंबईतील सर्वांत जास्त झाडांचा खून आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना झाला आहे.
मुंबई महापालिकेत आदित्य ठाकरे यांचे वडील स्वतः लक्ष देत असताना खासगी विकासकाला फायदा मिळावा, म्हणून वर्षाला सहा ते सात हजार झाडांचा खून केला गेला. त्यामुळे दुसऱ्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही.’’
बच्चू कडू यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाषा तानाशाहीची असल्याच्या केलेल्या आरोपावर ते म्हणाले, ‘‘बच्चू कडू यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आग्रह जरूर करावा. सरकारने त्यांच्या योग्य मागण्या ऐकाव्यात. मात्र, तानाशाहीची भाषा कोणताही मंत्री करत नाही. आपल्या विषयाच्या आग्रहासाठी एखाद्या मंत्र्यावर दोषारोप करणे, हेही कितपत योग्य आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेचा दावा न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यावरील कार्यवाही होईल.’’
पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी साताऱ्याचे जिल्हाध्यक्षपद घेतल्यापासून भाजपचे प्रवेश होत आहेत. त्यावर ते म्हणाले, ‘‘भाजपची राज्यात पाळेमुळे मजबूत आहेत, ती सुदृढ होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आमच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे प्रचंड परिश्रम, मेहनत घेऊन जमिनीवर पक्ष उभा करण्याचे काम बरीच वर्षे केले.
त्यामुळे जुने कार्यकर्ते, संघ परिवाराचे योगदान पश्चिम महाराष्ट्रात मोठे आहे. आमचा पक्ष सुदृढ होत असून, आमची व्याप्ती, परिवार वाढवत आहोत. त्यामुळे सबका साथ सबका विकास हेच आमचे धोरण असून, भाजप मजबूत तर महायुती मजबूत होईल आणि महायुतीला घेऊन भाजप पुढे चालेल, हे गणित स्पष्ट आहे.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.