
Kolhapur Politicak News पक्षीय आणि राज्यातील राजकीय राजकारणात एकमेकांच्या विरोधात असले तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणात कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची राजकीय सोयरीक चांगलीच जुळली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ असो वा कोल्हापूर जिल्हा बँक मधील सहकारातील राजकारणात राज्यातील शत्रू जिल्ह्यात एकमेकांचे घनिष्ठ मित्र बनले आहेत. अशातच मागील आठवड्यात झालेल्या गोकुळ दूध संघाच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ही राजकीय सोयरीक अत्यंत गडद झाली.
लोकसभा(Loksabha) आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभा ठाकलेले नेते गोकुळ दूध संघाच्या सत्कार समारंभ निमित्त एकत्र आले. मात्र स्टेजवर झालेल्या राजकीय टोलीबाजीने आणि एकमेकांच्या कळ काढण्याने भविष्यातील सहकारातील राजकीय गणित काय असू शकतात. याचा अंदाज आत्ताच लावणे कठीण असला तरी थोडेफार राजकीय संकेत आतापासूनच मिळत आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली गेली. काँग्रेस, राष्ट्रवादी(NCP), शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती सहकारात एकत्र आली. गोकुळ दूध संघाबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेत बदलत्या समीकरणांनी वेध घेतला. मात्र राज्यात झालेल्या सत्ता बदलाचा थेट परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर झाला. सहकारात मित्र असलेले राज्याच्या राजकारणात क्षणार्धात शत्रू बनले. त्यातूनच गोकुळच्या राजकारणावर सत्ता बदलाचा खेळ रंगला. मात्र त्यावेळी देखील वैद्यकीय मंत्री मुश्रीफ यांनी सहकारात आघाडी कायम राहणार असल्याचे संकेत दिले.
नुकतीच लोकसभा आणि विधानसभा पार पडली. या लोकसभा निवडणुकीत गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची भूमिका महायुती सोबत राहिली. राधानगरी मतदार संघातून आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा दिला. मात्र याचे गौडबंगाल काय? हे त्यांनाच ठाऊक आहे. गोकुळवर सत्ता बदल झाल्यानंतर महत्त्वाच्या भूमिका घेणारे विश्वास पाटील आणि अरुण डोंगरे यांच्यात अध्यक्षपदावरून स्पर्धा निर्माण झाली. मात्र ज्येष्ठ या नात्याने विश्वास पाटलांना पहिल्यांदा संधी देण्यात आली. तर पुढील दोन वर्षानंतर म्हणजे सध्या अरुण डोंगळे अध्यक्ष आहेत. पुढील एक वर्षासाठी अध्यक्ष निवडी पुन्हा होणार? की डोंगळे हेच अध्यक्ष राहणार? किंवा तिसऱ्याला संधी देणार? तिसऱ्याला संधी दिली तर तो पाटील गटाचा असेल की मुश्रीफ गटाचा असेल? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
एकंदरीतच पाहता गोकुळच्या निवडणुकीला अजून दोन वर्ष बाकी असले तरी आतापासूनच राजकीय सोयरीक जिल्ह्यातील नेत्यांना महत्त्वाची वाटू लागली आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) हे देखील गोकुळ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ स्तरावरून दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो. मात्र सभासदांनी पाच वर्षे दिल्याने सध्या तरी गोकुळमध्ये तशा हालचाली नाहीत. हे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. मात्र निवडणुकीवेळी वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे गोकुळची समीकरणे बदलू शकतात असेही संकेत आहेत.
तर दुसरीकडे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची विधान परिषदेची चर्चा जोरात आहे. महायुतीने विधान परिषद दिल्यास आगामी गोकुळच्या निवडणुकीत नवीन समीकरणे निर्माण होऊ शकतात. सातत्याने गोकुळ आणि जिल्हा बँकेतील राजकीय सोयरीकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा संशयकल्लोळ निर्माण होत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.