
महेश माळवे
Shivsena : (स्व.) बाळासाहेब विखे शिवसेनेमुळे केंद्रात, तर राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe Patil ) हे राज्यात मंत्री होते. आज विखे त्यांचे काम करत आहेत. नगर जिल्हा आपण उद्धव ठाकरे यांच्याकडून मागून घेतला असून येथील कार्यकर्त्यांना ताकद देतांनाच पालिकेत शिवसेनेची सत्ता आणून दाखवू, असा विश्वास शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी व्यक्त केला.
येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, शहरप्रमुख सचिन बडदे आदी उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तरी नगर जिल्ह्यात आघाडी होणार नाही. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. नगर जिल्हा आपल्यासाठी सोडावा या निमित्ताने आपलाही अनुभव घेऊन पहा असे आपण त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आगामी पालिका, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली टीम प्रत्येक मतदारसंघाची पाहणी करेल. त्याचा स्वतंत्र अहवाल तयार केल्यानंतर कोणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय घेतला जाईल. निवडणुका कशा लढवायच्या यासाठी आपल्याकडे यंत्रणा तयार आहे. आपल्या आजवरच्या अनुभवाच्या बळावर श्रीरामपूर पालिकेत सत्ता आणून दाखवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील कार्यकर्ते आपली लढाई प्रस्थापितांविरोधात असल्याचे सांगतात. मात्र, आता आपण या ठिकाणी लक्ष घातल्याने प्रस्थापितांचा प्रश्न बाजूला पडेल. मी कार्यकर्त्यांना पूर्णपणे ताकद देणारा असून त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्येही आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढा दिला. त्यातूनच मी आमदार व पुढे मंत्री झालो. आज नाशिक जिल्ह्यात कोणताही प्रस्थापित व कारखानदार लोकप्रतिनिधी नाही असे त्यांनी सांगितले. शिवसेना हा विचार असून शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भांडतील परंतु पक्ष सोडत नाहीत. आजवरचा आपला अनुभव असल्याचे त्यांनी सांगून यापुढे कार्यकर्त्यांनी आपापसात भांडायचे नाही, असा वडीलकीचा सल्लाही दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.