
Solapur, 19 June : जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यात आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी आज (ता. 19 जून) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीच्या गोविंद बागेत जाऊन भेट घेतली. आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत बळीराम साठे यांनी मला खंबीर साथ दिली आहे, यापुढच्या काळातही ते माझ्यासोबत राहतील आणि सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत साठे यांचा सहभाग असेल, असा शब्द पवार यांनी दिला. त्यानंतर साठे यांनीही बंड मागे घेत आपण शरद पवारांसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम साठे (Baliram Sathe) यांची उचलबांगडी करून त्या जागी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपल्याला जिल्हाध्यक्षपदावरून अपमानास्पदरित्या हटविण्यात आले आहे, असे समजून बळीराम साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्धार केला होता. अगदी शरद पवारांनी बोलवले, तरी आपण त्यांना भेटायला जाणार नाही आणि पक्षात राहणार नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले होते.
बळीराम साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्धार जाहीररित्या बोलून दाखविल्यानंतर संजय पाटील घाटणेकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची बारामतीत जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी पवारांनी बळीराम साठे यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द घाटणेकर यांना दिला होता. तो निरोप घाटणेकर यांनी साठे यांच्यापर्यंत पोहोचवला होता. त्यानंतर खुद्द पवार यांच्याकडून आज साठे यांना भेटीसाठी गोविंद बागेत बोलावणे आले होते.
साठे हे आपल्या समर्थकांसह आज सायंकाळी गोविंद बागेत दाखल झाले. पवारांची भेट होताच काका साठे यांचा निम्मा विरोध मावळला होता. ते त्यांच्या देहबोलीवरूनच लक्षात येत होते. बळीराम साठे यांनी आपल्याला आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत खंबीरपणे साथ दिली आहे. यापुढेही ते माझ्यासोबत राहतील. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग राहील, असा शब्द पवार यांनी या वेळी बोलताना दिला.
साठे यांचे जिल्हाध्यक्षपद कायम राहणार?
सोलापूर जिल्ह्याची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करून पूर्व विभागाची जबाबदारी बळीराम साठे यांच्या खांद्यावर कायम राहील, असे संकेतही शरद पवार यांनी या वेळी बोलताना दिले, त्यामुळे साठे यांचे जिल्हाध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता वाढली आहे.
मला पवारांच्या हृदयात स्थान
शरद पवार यांनी मला आजपर्यंत काय दिले, यापेक्षा मला त्यांच्या हृदयात स्थान आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. शरद पवार यांनी मी निवडणुकीच्या प्रक्रियेत बळीराम साठे असतील, अशी घोषणा केल्याने आपण पक्ष सोडण्याचा निर्णय मागे घेत आहोत, असेही साठे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार पक्षाच्या कामात लक्ष घालणार
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कारभारात आपण स्वतः लक्ष घालणार आहोत, असे खुद्द पवार यांनी शिष्टमंडळासमोर बोलताना सांगितले. तसेच, पक्षाच्या सर्व निर्णय प्रक्रियेत सहभाग राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. पवारांच्या भेटीनंतर बळीराम साठे यांचे बंडही शमले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.