

Solapur, 05 April : बारामतीची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लढवली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी सपकाळ आणि काँग्रेसला सुनावत त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या घोषणेतील हवाच काढली आहे.
बारामती (Baramati) पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाण म्हणाले, बारामती मतदारसंघ हा नेहमीच शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मतदारांची मानसिकता ही नेहमीच पवार कुटुंबाच्या आणि विशेषतः अजित पवारांच्या बाजूने राहिलेली आहे.
एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळावी, अशी जनभावना असते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत अशा वेळी सहानुभूती महत्त्वाची ठरते, असेही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्पष्ट केले.
बारामतीची निवडणूक जर बिनविरोध झाली, तर त्यातून समाजात एक चांगला संदेश जाईल. राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची ही परंपरा जपायला हवी. अजित पवारांनी मतदारसंघात केलेले काम आणि लोकांचे त्यांच्यावरील प्रेम यामुळे ही निवडणूक त्यांच्या कुटुंबासाठी अनुकूल असेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडणूक लढविण्याच्या घोषणेबाबत अशोक चव्हाण म्हणाले, बारामतीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व पूर्वीपासूनच नगण्य राहिलेले आहे. त्यामुळे काँग्रेसने तिथे उमेदवार उभा केला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, ती केवळ एक औपचारिकता ठरेल, असा टोला त्यांनी लगावला.
इतर पक्षांतील अंतर्गत वादांवर भाष्य करणे त्यांनी टाळले, परंतु नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी मान्य केले. राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणे किंवा एकमेकांना टार्गेट करणे, ही जुनी पद्धत आहे, यात नवीन काहीच नाही, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
विमान तपासणी प्रकरणावरही अशोक चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले, एखाद्या घटनेचा निष्कर्ष काढण्यापूर्वी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशीचा अहवाल आल्याशिवाय घाईघाईने कोणतीही कारवाई करणे योग्य नाही. देशात सर्वत्र चार्टर्ड आणि कमर्शियल विमान सेवा उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असले तरी, तपासाअंतीच योग्य तो निर्णय घ्यावा.
अशोक चव्हाण म्हणाले, नांदेडमध्ये काल घडलेल्या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील दोन्ही गट हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. अशा हिंसक घटनांमुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होते.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून पोलिस प्रशासन यावर लक्ष ठेवून आहेत. समाजात भीती पसरू नये आणि सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.