

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी वारीदरम्यान मंगळवेढ्यात बबनराव आवताडे यांच्या कार्यालयाला भेट दिली, जिथे भगीरथ भालके यांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण आले.
भालके-आवताडे-शिंदे या संभाव्य तिकडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
वर्षभर निष्क्रीय राहिलेल्या भगीरथ भालके यांनी पुन्हा सक्रिय होत शिंदे गटाशी जवळीक दाखवल्याने काँग्रेसपासून त्यांचा दुरावा वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
Mangalvedha, 01 November : स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्यास काही दिवसांचा अवधी होत असतानाच कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवासादरम्यान जिल्हा बॅंकचे माजी उपाध्यक्ष तथा भाजप आमदार समाधान आवताडे यांचे काका बबनराव अवताडे यांच्या कार्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान भगीरथ भालके यांच्या उपस्थितीमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भातील राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. मंगळवेढा (Mangalvedha) नगरपालिकेसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. आक्षेप दाखल केल्यानंतर मतदार यादीतील पात्र मतदार शिल्लक राहणार आहेत, अशा परिस्थितीत येणारी निवडणूक दुरंगी होणार की बहुरंगी, याविषयी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने शासकीय महापुजेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सोलापूरहून मंगळवेढामार्गे पंढरपूरला जात असतानाच दामाजी चौकात भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित जगताप, प्रवीण खवतोडे, ॲड संभाजी घुले, धनाजी खवतोडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. या वेळी आवताडे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांचा आज वाढदिवसही होता.
बबनराव आवताडे यांच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्यासह शिवसेनेचे महेश साठे, शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार, तालुकाध्यक्ष आबा लांडे यावेळी उपस्थित होते. भगीरथ भालके यांचा विधानसभा निवडणुकीत निसटच्या मताने पराभव झाला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत भालके-आवताडे आणि शिवसेना असे समीकरण भविष्यात जुळले तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते, त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय हालचाली निर्णयाक टप्प्यावर येऊन ठेपल्या आहेत.
वर्षभरात भगीरथ भालके यांनी कोणतीही राजकीय भूमिका न घेतलेली नव्हती. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गेल्या चार दिवसांत भालके सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मंगळवेढ्यात आवताडे यांच्या कार्यालयात भगीरथ भालके हे उपस्थित राहिल्याने भालके गट हा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेसोबत काम करताना दिसेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काँग्रेसकडून निवडणूक लढवताना भगीरथ भालके यांना बबनराव अवताडे यांनी पाठिंबा जाहीर करून मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात भालके यांच्या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते.
विधानसभेनंतर कोणत्याही निवडणुका नसल्याने हे दोघे एकाही ठिकाणी दिसून आले नाहीत. मात्र, आज शिंदे यांच्या मंगळवेढा दौऱ्यात आवताडे यांच्या कार्यालयात भालके यांनी उपस्थिती लावल्याने भालके यांची राजकीय भूमिका कोणती असेल, याबाबत निर्माण होत असलेल्या प्रश्नांना एक प्रकारे उत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Q1. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवेढ्यात का आले होते?
A1. ते कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेसाठी पंढरपूरला जात असताना मंगळवेढ्यात थांबले.
Q2. कोणत्या कार्यालयात शिंदे यांनी भेट दिली?
A2. भाजप आमदार समाधान आवताडे यांचे काका आणि जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्या कार्यालयात.
Q3. भगीरथ भालके यांच्या उपस्थितीने काय चर्चा सुरू झाली?
A3. भालके शिंदे यांच्या शिवसेनेसोबत येऊ शकतात, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
Q4. स्थानिक निवडणुकीत कोणती नवी समीकरणे दिसू शकतात?
A4. भालके-आवताडे-शिंदे या तिघांच्या एकत्र येण्याने मंगळवेढ्यात राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.