Satara ZP : शशिकांत शिंदेंच्या मदतीला अजितदादांची राष्ट्रवादी धावणार? शिंदेंच्या आमदाराचा वारू थोपवण्यासाठी नवे समीकरण

Satara ZP, Pancahyat Samiti Election 2025 : कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. भाजप-शिवसेना युतीविरोधात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या चर्चेने वातावरण तापले आहे.
Mahesh Shinde-shashikant shinde-makarand patil
Mahesh Shinde-shashikant shinde-makarand patilSarkarnama
Published on
Updated on
  1. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू असून, महायुती की महाविकास आघाडी? या संदर्भात अद्याप स्पष्टता नाही.

  2. शिवसेना (महेश शिंदे गट) आणि भाजप एकत्र लढण्याची चिन्हे असताना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांची (शरद पवार आणि अजित पवार) जवळीक वाढल्याची चर्चा आहे.

  3. कोरेगावातील निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता असून, २०१७ मध्ये राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीत वर्चस्व होता.

Koregaon, 01 November (पांडुरंग बर्गे ) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट-गणांचे आरक्षण आणि प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला जोमाने सुरुवात केली आहे. निवडणूक स्वबळावर, महायुतीद्वारे की महाविकास आघाडीद्वारे लढायची, याबाबत नेमकी स्पष्टता दोन्ही बाजूंकडून येत नसल्याने संभ्रमावस्था दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कोरेगावमध्ये भाजप-शिवसेना एकत्र लढण्याची चिन्हे आहेत. मात्र, महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढली आहे, त्यामुळे कोरेगावात भाजप-शिवसेना युतीविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे.

कोरेगाव तालुका हा पूर्वापार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला राहिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही ते प्राबल्‍य दिसत होते. मात्र, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मूळचे भारतीय जनता पक्षाचे मात्र ऐन निवडणुकीच्यावेळी तत्कालीन भाजप- शिवसेना (एकत्रित) यांच्यातील अंतर्गत तडजोडीतून आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी हातात शिवबंधन बांधून घेतले.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा पराभव करत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला महेश शिंदे यांनी सुरुंग लावला. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) धनुष्यबाण चिन्हावर लढून विजयश्री खेचून आणली. या विजयाने त्‍यांनी मतदारसंघावरील कमांड भक्कम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली आहे.

कोरेगाव तालुक्यात सध्‍या काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या सहा प्रमुख पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रिपब्लिकन पक्षाचे काही गट कार्यरत आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत महायुती म्हणून सत्तेत असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र लढणार की महाविकास आघाडी म्हणून कार्यरत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे तीन पक्ष आघाडी म्हणून लढणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गट-गणांमध्ये स्‍वबळावर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे; परंतु नेत्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. सर्वच पक्षांचे नेते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नेमकी कशी लढावी, याबाबत मतदार, कार्यकर्त्यांशी संपर्क साधत कानोसा घेत आहेत.

तालुक्याची सध्‍याची राजकीय स्थिती पाहता आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, तर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रिया महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्ष जसे महायुतीत एकत्र काम करत आहेत, तसेच एकदिलाने कार्यरत आहेत. महायुतीमधील तिसरा घटक पक्ष असलेला मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भाजप-शिवसेनेपासून चार हात लांब राहून कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

Mahesh Shinde-shashikant shinde-makarand patil
Dilip Mane Politic's : दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशामागे सोलापूर बाजार समिती? फडणवीस सरकारने निर्णय घेतल्यास राजकारण संपण्याचा धोका

उलट पक्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे विरोधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी अधिक जवळीक ठेवून असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यावर नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोरेगावमधील २०१७ मधील पक्षीय बलाबल

जिल्हा परिषद

राष्ट्रवादी काँग्रेस (एकत्रित) : ४

काँग्रेस : १

पंचायत समिती

राष्ट्रवादी काँग्रेस (एकत्रित) : ७

काँग्रेस : २

शिवसेना (एकत्रित) : १

भाजप-शिवसेनेची सोयरीक, राष्‍ट्रवादीची आघाडीशी जवळीक

तालुक्यात काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष तुलनेने कमी शक्तीचे असल्यामुळे ते आघाडीसोबत आघाडीधर्म पाळत निष्ठेने कार्यरत असल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत सध्‍या तरी एक तर महायुती विरुद्ध आघाडी यांच्यात लढत होईल अथवा भाजप, शिवसेना या दोन पक्षांच्या युती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या चार पक्षांची आघाडी अशी निवडणूक होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. हे चित्र स्पष्ट होताना फलटण-कोरेगाव, उत्तर कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातील त्या त्या पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेतले जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय गट-गण

कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण सहा गट आणि त्याअंतर्गत १२ गण आहेत. त्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारारोड, कुमठे, एकंबे हे तीन, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदासंघात पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन हे दोन, तर कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात वाठार किरोली या एका गटाचा समावेश आहे.

पिंपोडे बुद्रुक गटांतर्गत सोनके व पिंपोडे बुद्रुक हे दोन गण, फलटण-कोरेगाव, वाठार स्टेशन गटांतर्गत वाठार स्टेशन गण (सहा गावांसह) फलटण- कोरेगाव, अंबवडे संमत वाघोली गण कोरेगाव, सातारारोड गटांतर्गत सातारारोड व किन्हई गण कोरेगाव, कुमठे गटांतर्गत कुमठे व ल्हासुर्णे गण कोरेगाव, एकंबे गटांतर्गत एकंबे गण कोरेगाव व साप गण उत्तर कऱ्हाड, वाठार किरोली गटांतर्गत वाठार किरोली व आर्वी गण कऱ्हाड उत्तरमध्‍ये समाविष्ट आहेत.

Mahesh Shinde-shashikant shinde-makarand patil
Praveen Darekar on MVA Morcha : प्रवीण दरेकरांनी उडविली विरोधकांच्या मोर्चाची खिल्ली; ‘असत्याची पाठराखण करायची अन्‌ नाव....’

Q1. कोरेगावमध्ये कोणते प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत?
A1. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे).

Q2. महायुती आणि महाविकास आघाडीची सध्याची स्थिती काय आहे?
A2. महायुतीत भाजप-शिवसेना एकत्र काम करत आहेत, तर दोन्ही राष्ट्रवादी गट आघाडीकडे झुकत आहेत.

Q3. २०१७ मधील कोरेगाव जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाचे वर्चस्व होते?
A3. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४ जागा आणि काँग्रेसकडे १ जागा होती.

Q4. आगामी निवडणुकीत कोणती लढत अपेक्षित आहे?
A4. महायुती (भाजप-शिवसेना) विरुद्ध महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी-उद्धव गट) अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com