Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघाचे भवितव्य ठरवणाऱ्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतमोजणीत आज कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला. मतमोजणी सुरू असतानाच एका टेबलावरील कर्मचाऱ्याने मतपत्रिकेत खाडाखोड करून विरोधी गटातील उमेदवाराला मत दिल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी मध्यस्थी करत तत्काळ दोन्ही कार्यकर्त्यांना शांततेचे आव्हान केले.
मतमोजणी सुरू असतानाच एका टेबलवर एका मतमोजणी कर्मचाऱ्यांनी खाडाखोड करून दुसऱ्या आघाडीच्या उमेदवाराला मत दिल्याचे लक्षात येताच परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे मतमोजणी केंद्रात सुमारे अर्धा तास गोंधळ सुरू होता.
राशिवडे गटातील एका गावातील मतमोजणी घेतल्यानंतर मिळालेल्या मतांची नोंद करीत असताना टेबलवरील कर्मचाऱ्यांनी खाडाखोड करून विरोधी आघाडीला ते मत नोंदवले. हे निदर्शनास येताच शिवसेनेचे निवास पाटील, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला.
निवडणूक अधीकरी नीलकंठ करे यांना घेराव घालून संबंधित कर्मचारी यंत्रणा ही मॅनेज केली असून, हे सर्व संस्थेचे सचिव आहेत. जिल्हा बँकेचे गुलाम आहेत. त्यामुळे यंत्रणा मॅनेज केली आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा गोंधळ झाला. पोलिस उपधीक्षक अजय सिकंदर यांनी तक्रार बाजू समजून घेत शांततेचे आवाहन केले.