
Solapur, 07 September : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे नाहीत. भुजबळ ताठ मानेने उभे राहतील, तेव्हा महाराष्ट्राचे चित्र बदललेले असेल. आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो, तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जबाबदारीची जाणीव करून द्या, असे आवाहन ओबीसी आरक्षणाबाबत लक्ष्मण हाके यांनी मंत्री भुजबळ यांना केले.
बीडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आज (ता. 07 सप्टेंबर) सोलापूरमध्ये पत्रकरांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मराठा-कुणबी नोंद असलेल्या व्यक्तींना ओबीसीमध्ये समाविष्ठ करून घेण्याबाबत काढलेल्या परिपत्रकावरून मंत्री भुजबळ यांना आवाहन केले आहे.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले, कुठल्याही सरकारला किंवा शासनाला एखाद्या व्यक्तीचे आडनाव लावू नये, असं आदेश देण्याचा अधिकार नाही. आडनाव झाकून जात व्यवस्था नष्ट होणार असेल तर तसे होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, जात कधीच जाणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आडनाव लपून जात लपत नसते.
ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाडे म्हणाले, लक्ष्मण तायवाडे एकदा जीआर घेऊन प्रत्येक शब्दाचा खल करू. कायदेशीर संदर्भ तपासू. डिक्शनरीत त्याचा अर्थ शोधू. तायवडे साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात, ओबीसी नेते असल्याप्रमाणे वागा. तुमच्या खांद्यावर ओझे आहे; म्हणून काहीही बोलण्याच्या भानगडीत पडू नका. आधी जीआर रद्द करण्याच्या लढाईत सामील व्हा. नाहीतर आम्हाला खोलात जाऊन बोलावे लागेल, असा इशाराही त्यांनी ओबीसी महासंघाच्या प्रमुखांना दिला आहे.
धारूरमधील सभेचे बॅनर फाडल्याबद्दल हाके म्हणाले, ओबीसी आरक्षण बचावासाठी आम्ही राज्यभर यात्रा काढणार आहोत, त्यासाठी सभा घेत आहोत. मात्र, आमच्या सभेच्या ठिकाणचे बॅनर फाडले जात आहेत. तरीही आम्ही या सभा घेणार आणि आरक्षण बचाव यात्रा काढणारच. या जीआरबाबत किंवा ओबीसीच्या बाजूने आमदार, खासदार बोलायला तयार नाहीत. मी जिथे जिथे जातोय, तिथे हल्ले होत आहेत.
धारूरमध्ये सभेच्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे, भगवान बाबा यांचे फोटो असलेल्या कमानीचे बॅनर फाडण्यात आला आहे. आमचं मॉरल डाऊन करणे, लक्ष्मण हाकेचे बोलणे बंद पाडणे, यासाठी ही माणसं आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आली आहेत. झुंडशाहीच्या जोरावर त्यांनी शासनाकडून कागदाचा काळं पांढरं करण्याचा प्रयत्न केला आहे. या जीआरचा लीगल ऍस्पेक्ट काय आहे, तसेच कोर्टात या जीआर बाबत काय होणार, हे मला माहिती आहे, असा दावाही हाके यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात आणि मराठा आरक्षणाच्या श्रेयवादाबाबत लक्ष्मण हाकेंनी भाष्य केले. ते म्हणाले, श्रेय कोणी काय घ्यायचं, ते त्यांना लखलाभ असो. मात्र, ओबीसींचे आरक्षण संपले, त्यांच्या अन्नात माती कालवली गेली, हे सत्य आहे.
वंचित शोषितांच्या प्रतिनिधित्वासाठी राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला. निवडणुकीत आपल्या पक्षासाठी, आमदार खासदारसाठी श्रेय घेणार असतील तर अठरापगड जातीचे हे दुर्दैव आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमचे आरक्षण उद्ध्वस्त करणार असाल, तर तुम्हाला कसं उद्ध्वस्त करायचं हे इथले ओबीसी ठरवतील, असा इशाराही त्यांनी फडणवीसांना दिला.
मुख्यमंत्री जाहिरातीबाबत ते म्हणाले, माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. तुम्ही दहा टक्के मतांच्या बेरजेसाठी या गोष्टी करत असाल तर 50 टक्के मतं वजा झालेली असतील. तुम्ही आमचा डीएनए ओबीसीचा आहे, असं सांगितलं होतं. मात्र, तो दिसून येत नाही. दहा टक्के मतांसाठी 50 टक्के मतं विसरून जा, एवढं मुख्यमंत्र्यांना नक्की सांगणं आहे.
मराठा आरक्षण प्रकरण कोर्टात जाईल. सुनावण्या होतील, तोपर्यंत पंचायतराज निवडणूक होतील, त्यामुळे हे सारे निवडणुकीसाठी केले का, असे अनेक प्रश्न आहेत म्हणून याला तत्काळ स्टे घेणे गरजेचे आहे, असेही हाकेंनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.