
Solapur, 07 September : माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरुम उपसाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परीविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकावल्याच्या व्हिडिआने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी खुद्द अजितदादांनी खुलासाही केलेला आहे. मात्र, कुर्डूतील मुरुमउपसा आणि त्या व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील माेहिते पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘एका मध्यस्थी व्यक्तीच्या दबावापोटी अजितदादांना प्रोटोकॉल सोडून बोलण्याची वेळ आली,’ असे मोहिते पाटील यांनी म्हटले आहे, त्यामुळे अजितदादांवर दबाव कोणी आणला, असा सवाल उपस्थित होत आहे.
धैर्यशील माेहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले, माढा तालुक्यातील कुर्डू येथे घडलेला सर्व प्रकार समोर आला आहे, त्यापेक्षा वेगळाच आहे. महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना जी काही फोनाफोनी झाली. वास्तविक पाहता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावरील लोकप्रतिनिधी हे खाली (छोट्या अधिकाऱ्यांना) सहसा कुठे फोन लावत नाहीत. मी फार जवळून या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक तर ते जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांना निर्देश देतात आणि सत्यता पडताळून कार्यवाही करा, अशा सूचना करतात.
कुर्डू गावात वेगळीच घटना घडलेली आहे. एका व्यक्तीने डीवायएसपी अंजली कृष्णा यांची रेड पडल्याचे दुसऱ्या एका व्यक्तीला सांगितले. त्या व्यक्तीने डीवायएसपी कृष्णा यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, त्या अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने कॅमेऱ्यात दिसणाऱ्या व्यक्तीला घेऊन कॉन्फरन्स कॉल करून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना फोनवर घेतलं.
त्या व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीने थेट अजितदादांना फोन लावला नव्हता. जो मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने अजित पवार यांना फोन लावला हेाता. त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना प्रोटोकॉल सोडून अधिकाऱ्याला बोलण्याची वेळ आली, असेही खासदार मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायचं असतं. जबाबदारीने वरिष्ठांना सांगायचं असतंय आणि जबाबदारीनं काम करून घ्यायची असतात. कुर्डूमधील अनेक सातबारे माझ्याकडे आहेत. ते सर्व सातबारे मी माध्यमांना देतो.
विधानसभा निवडणुकीनंतर डीपीसीची पहिली बैठक झाली, त्यात आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात वाळूमाफिया, मुरूममाफिया असल्या गोष्टी खपवून घेणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले होते. तसे आदेशही त्यांनी दिले होते. पण, त्यात पुन्हा थंडावा आलेला आहे.
पालकमंत्री गोरे यांना माझी विनंती आहे की, कुर्डूमधील सरकारी जमिनीवरील करोडो रुपयाचा मुरुम आजपर्यंत चोरीला गेला आहे. मागासवर्गीस समाजाचे अनेक लोक नोकरी, उदरनिर्वाहनिमित्त पुणे, मुंबईला गेले आहेत. त्यांच्या शेतातूनही किती मुरुम गेलेला आहे, हे तपासण्याची गरज आहे. जिल्हाधिकरी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ‘सुमोटो’ प्रमाणे त्यांनी तपासणी करावी, अशी मागणीही मोहिते पाटील यांनी केली.
मोहिते पाटील म्हणाले, कुर्डूमधील त्या मुरुम उपशाबाबत सांगितलं जातंय की, तो मुरूम विकास कामांसाठी नेला जात होता. मात्र, त्यासाठी परवानगी लागते. सरकारने अनेक परवानग्या सुलभ पद्धतीने केलेल्या आहेत. पण, कुर्डूमधील मुरुम उपशाबाबत अशी कोणतीही प्रक्रिया राबवलेली नाही. उलट कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे आणि एका चांगल्या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकाऱ्याला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचे काम केले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी माझी त्यांना विनंती राहील. खरे गुन्हेगार आणि मुरुम माफिया यांची चौकशी करण्यात यावी. त्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.