

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे शाखेत मध्यरात्री चोरट्यांनी 22 लॉकर फोडले.
सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी व मोठी रोकड चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
CCTV बंद करून DVR नेल्यामुळे चोरी पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sangli Crime News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) शाखेत चोरट्यांनी स्ट्राँग रूम फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला. तब्बल 22 लॉकर्स फोडत चोरट्यांनी सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड लंपास केल्याने आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर चोरांनी हँडग्लोव्हज, तंत्रज्ञान आणि प्लॅनिंग करत चोरी करत पोलिसांनाच थेट आव्हान निर्माण केले आहे. सध्या घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून श्वान पथक आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीचा तपास वेगात सुरू केला आहे. तर जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी अशी याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, झरे येथील बसस्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँक भाड्याने कार्यरत आहे. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी पूर्वेकडील बाजूची खिडकी कटरने कापून बँकेत प्रवेश केला.
अत्यंत सराईतपणे चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने स्ट्राँग रूममधील तब्बल 22 लॉकर्स फोडले. ग्राहकाचे लॉकरमध्ये असलेले सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड असा कोट्यवधींचा ऐवजही लंपास करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर उघडकीस आली.
चोरट्यांची प्रोफेशनल चोरी
चोरट्यांनी चोरी करताना पकडले जाऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतल्याचे दिसून आले. बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडले. तसेच संशयास्पद हालचाली रेकॉर्ड झालेला डीव्हीआर (DVR) देखील सोबत नेला आहे. तर तपासात आपल्या हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी हँडग्लोव्हजचा वापर चोरट्यांनी केल्याचेही आता तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे, याच बँकेत एक वर्षापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. तरीही सुरक्षेबाबतच्या त्रुटी कायम होत्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बँक ग्राहकांनी शाखेबाहेर मोठी गर्दी केली होती. आपली आयुष्यभराची पुंजी आणि दागिने चोरीला गेल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि संतापाचे वातावरण बनले होते.
या घटनेनंतर आता आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ठसे तज्ज्ञ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पाचारण केले. तसेच श्वान पथक ही मागवले होते. या घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर, बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पोलीस उपअधीक्षक कल्पना बारवकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू होते.
बँकेचे लॉकर मधील ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या नुकसान भरपाईबाबतचे धोरण स्पष्ट नसल्याने ज्यांचे लॉकर फुटले आहेत, ते ग्राहक हवालदिल झाले आहेत. पोलीस आता परिसरातील अन्य सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आटपाडी पोलिस करत आहेत.
1. ही चोरी कुठे झाली?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) शाखेत.
2. चोरीत किती ऐवज लंपास झाला?
सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड चोरी झाल्याचा अंदाज आहे.
3. चोरट्यांनी CCTV कसे टाळले?
बँकेत प्रवेश करताच CCTV बंद करून DVR सोबत नेला.
4. पोलीस तपास कुठवर पोहोचला आहे?
श्वान पथक व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास सुरू आहे.
5. याआधीही चोरीचा प्रयत्न झाला होता का?
होय, सुमारे एक वर्षापूर्वी अयशस्वी चोरीचा प्रयत्न झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.