

मोहोळ नगराध्यक्षपदासाठी भाजपने शीतल सुशील क्षीरसागर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली, ज्यामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
क्षीरसागर कुटुंबाचे भाजपशी दीर्घ राजकीय संबंध, त्यांच्या पुनरागमनासह, पक्षाने ही उमेदवारी परिवाराला देऊन कार्यकर्त्यांना न्याय दिल्याचे मानले जात आहे.
या जागेसाठी बारा इच्छुक होते, परंतु अंतिम स्पर्धा मदन सोनवणे व शीतल क्षीरसागर यांच्यात होती; अखेर सुशील क्षीरसागर यांच्या मजबूत लोकसंपर्कामुळे उमेदवारी त्यांच्या पत्नीला देण्यात आली.
Solapur, 16 November : भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. मोहोळच्या नगराध्यक्षपदासाठी शीतल सुशील क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केली आहे. मोहोळमध्ये भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी घोषणा केल्यानंतर तालुकाध्यक्ष सतीश काळे यांनी शीतल क्षीरसागर यांना एबी फार्मचे वाटप केले. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेला क्षीरसागर कुटुंबीयांचे पूर्वीचे कट्टर राजकीय विरोधक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते. मोहोळमध्ये (Mohol) क्षीरसागर कुटुंबीयांत उमेदवारी देऊन भाजपने मूळ कार्यकर्त्यांना न्याय दिल्याचे मानले जात आहे.
शीतल क्षीरसागर ह्या भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर यांच्या सूनबाई आहेत. त्यांचे पती सुशील क्षीरसागर हे भाजपचे मागील टर्ममध्ये नगरसेवक होते. क्षीरसागर कुटुंबीय हे भाजपचे कट्टर समर्थक ओळखले जाते. मध्यंतरी नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र सुशील क्षीरसागर हे भाजपसोबत एकनिष्ठ राहिले होते.
मध्यंतरी नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला. क्षीरसागर कुटुंबीय हे भाजप आणि शिवसेना विचाराचे समर्थक राहिलेले आहे. त्यांच्या या भाजपसोबत असणाऱ्या नात्याचा विचार करून पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी क्षीरसागर कुटुंबामध्ये देण्यात आली आहे. आता क्षीरसागर यांच्या विरोधात किती उमेदवार उतरतात, हे पाहावे लागणार आहे.
मोहोळच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक बारा इच्छुकांनी उमेदवारी मागणी केली होती. त्यातील बहुतांश इच्छूक सक्षम होते. मात्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी खरी स्पर्धा ही मदन सोनवणे आणि शीतल क्षीरसागर यांच्यामध्ये दिसून आली होती. अखेर भाजपश्रेष्ठींनी पक्षाचे माजी नगरसेवक सुशील क्षीरसागर यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली.
सुशील क्षीसागर यांचा राजकारण, समाजकारण व विविध व्यवसायाच्या माध्यमातून असलेला लोकसंपर्क तसेच पक्ष संघटनेसाठी दिलेले संघटनात्मक योगदान अशा विविध जमेच्या बाजू लक्षात घेता नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांच्या पत्नीला घोषीत करण्यात आलेली आहे.
क्षीरसागर कुटुंबियांनी आजपर्यत माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात राजकारण केले आहे. खासदारकी आमदारकी, जिल्हा परिषद अशा निवडणुका त्यांनी राजन पाटील यांच्या विरोधात लढविल्या आहेत.
आता खुद्द राजन पाटीलच भाजपमध्ये आल्यामुळे अखेर आमदारकी मिळाली नाही तर चालेल पण नगराध्यक्षदाच्या माध्यमातून मिनी आमदारकी तरी मिळवायची अशी जिद्द बाळगणाऱ्या क्षीरसागर परिवाराला जुन्या नव्या भाजपा कार्यकर्त्यांचा मेळ घालत भूतकाळातील राजकीय घटनांबाबत स्पष्टीकरण देत प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
अनगरसाठी राजन पाटलांच्या सूनबाईंना एबी फार्म
अनगर नगरपंचायतीसाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाईंना उमेदवारी आणि एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. मात्र, अनगरला नगरपंचायत असून नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी मोहोळमधून शीतल क्षीरसागर यांची पहिलीच उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.
शीतल सुशील क्षीरसागर यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली.
भाजपशी असलेल्या दीर्घ निष्ठा, लोकसंपर्क आणि पक्षासाठीचे योगदान लक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आली.
मोहोळ नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे एकूण 12 इच्छुकांनी मागणी केली होती.
पूर्वी राजकीय विरोधक असले तरी, पत्रकार परिषदेला ते उपस्थित होते आणि आता भाजपमध्ये सामील झाल्याने समीकरणे बदलली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.