

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मायक्रो प्लॅनिंग सुरू केले असून गटबाजी टाळण्यासाठी विशेष दक्षता घेतली आहे.
सोलापूरमध्ये वरिष्ठ आमदार विजयकुमार व सुभाष देशमुख यांना डावलून पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवडणूक प्रभारी आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवडणूक प्रमुख नेमण्यात आले आहे.
या निर्णयामुळे देशमुख समर्थकांमध्ये नाराजी असून निवडणूक निकालानंतर पक्षांतर्गत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Solapur, 20 December : महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मायक्रो प्लनिंग सुरू केले आहे. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी उफाळून येऊ नये, यासाठी भाजपने विशेष दक्षता घेतली आहे. सोलापूरमध्ये मात्र पक्षनेतृत्वाने वरिष्ठ आमदार असलेल्या दोन्ही देशमुखांना डावलून निवडणुकीची धुरा पुन्हा एकदा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या खांद्यावर सोपवली आहे. सोलापूर महापालिकेची मागील निवडणूक जिंकणाऱ्या दोन्ही देशमुखांना पक्षाने निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवल्याने त्यांच्या समर्थकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवडणूक प्रमुख करण्यात आले आहे. वास्तविक भाजपचे वरिष्ठ दोन आमदार शहरातील असताना निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी बाहेरचे नेमण्यात आले आहेत, त्यामुळे देशमुख समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजपमध्ये आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना साईडलाईनला टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः पक्षांतर्गत जबाबदारी देताना तरुण चेहऱ्याला पक्षाकडून संधी दिली जात आहे. नगरपालिका निवडणुकीच्या काळातही दोन्ही देशमुखांना भाजपने दूरच ठेवले होते.
दोन्ही देशमुखांचे मतदारसंघ महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येतात. मागील पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही देशमुखांमध्ये गटबाजी असूनही महापालिकेवर सत्ता मिळविली होती. सध्या दोन्ही देशमुखांमध्ये समेट झालेला आहे. त्यानंतरही पक्षाने दोन्ही देशमुखांना डावलून महापालिकेची सूत्रे गोरे आणि कल्याणशेट्टी जोडीकडे दिली आहेत.
जयकुमार गोरे पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी पक्षवाढीसाठी आक्रमक धोरण अवलंबिले आहे, त्यासाठी त्यांनी इतर पक्षांतील मातब्बरांना भाजपत आणून सोलापूर जिल्ह्यात सबकुछ भाजप करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध दर्शविला होता. पण त्यांचा विरोध डावलून मानेंना अखेर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे.
नगरपालिका निवडणुकीचा उद्या निकाल असून त्यात भाजपची सरशी झाली तर गोरेंचे पक्षातील स्थान आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजपला कमी जागा मिळाल्या तर मात्र दोन्ही देशमुख पक्षात आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संघाच्या मुशीत घडलेले हे दोन्ही नेते सध्या शांत असले तरी त्यांच्यातील नाराजीचा स्फोट कधीही होऊ शकतो, अशी सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये भावना आहे.
1) प्रश्न: सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी कोण आहेत?
उत्तर: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवडणूक प्रभारीपद देण्यात आले आहे.
2) प्रश्न: निवडणूक प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.
3) प्रश्न: दोन्ही देशमुख आमदारांना का डावलले गेले आहे?
उत्तर: पक्ष नेतृत्वाने तरुण चेहऱ्यांना संधी देत दोन्ही देशमुखांना सध्या साईडलाईन केले आहे.
4) प्रश्न: भाजपच्या निकालावर पक्षातील राजकारणाचा काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: चांगला निकाल लागल्यास गोरे मजबूत होतील, अन्यथा देशमुखांकडून आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.