पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापलथ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड (त्यांच्या भाषेत उठाव) केलं आणि राज्याच्या राजकारणाचं समीकरणंच बदललं आहे. शिंदेंनी बंड केला तेव्हा त्यांच्यासोबत २० आमदार होते. मात्र यानंतर तब्बत सेनेचे २० आणि अपक्ष 10 अशा ५० अमदारांनी जणू व्हाया 'मातोश्री' सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं आणि राज्यात सत्तांतर घडवलं. यामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी भाजपच्या साथीने राज्यात नवं सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. सरकार स्थापन झाल्यावर शिंदे गटासोबत गेलेल्या अनेक आमदारांनी अनेक स्वप्न रंगवली होती. यामध्ये काहींची पुर्णही झाली. पण अनेकजण त्या प्रतिक्षेतच आजही दिसतात. यामध्ये अपक्ष गटातील आमदारांच्या पदरी तर अद्यापही काहीच लागलेलं नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे राज्यमंत्री होते. मात्र नव्या सरकारमध्ये त्यांना तेही मिळालं नसल्याने ते कमालीचे नाराज आहेत, त्यातच त्यांच्या मागे कोर्ट-कचेऱ्या लागल्याने ते पुरते हैराण झालेले दिसत आहेत. तसेच शिंदे गटात गेलेल्या काही आमदार आणि मंत्र्यांना सत्ता आली तरी ती काही मानवत नसल्याच चित्र सध्या तरी दिसत आहे. (Abdul Sattar, Bacchu Kadu, Sanjay Rathod, Sanjay Shirsath News )
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याचा आरोप बंडखोर आमदारांकडून केला गेला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विशेष करून माजी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते,असा आरोप करण्यात आला. हे कारण देत शिंदे यांच्यासोबत सेनेच्या चाळीस तर अपक्ष 10 आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत युती करत नवं सरकार स्थापन केल.
भाजपसोबत सत्तेत असल्यामुळे आपल्या मतदारसंघाला चांगला निधी मिळेल. हिदुत्ववादी विचारधारेचे दोन पक्ष असल्याने चांगले काम करता येईल,असा युक्तिवाद बंडखोर आमदारांकडून करण्यात आला. मात्र खोके घेऊन आमदार फोडल्याचा सातत्याने आरोप शिवसेनेकडून (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीकडून सातत्याने करतण्यात येत आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून बंडखोर आमदारांकडून हिंदुत्वाशी तडजोड वा प्रतारणा नाहीच, आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आणि आम्हीच खरी शिवसेना,असा दावा केला जात आहे. मात्र असे असले तरी नव्या सरकारमध्ये आपल्या पदरी काहीतरी पडेल, या आशेने अनेकजणं शिंदे गटात सामिल झालेले आहेत. मात्र, सत्ता येवूनही शिंदे गटच्या आमदार आणि मंत्र्यांना ती मानवतांना दिसत नाही, असेच दिसत आहे आणि बोललही जात आहे.
यामध्ये पहिल नाव म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच आहे. त्यांच नव्या सरकारमध्ये प्रमोशन झालं आणि राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मात्र, त्यानंतर टीईटी घोटाळा, कृषी मंत्री झाल्यावर सरकारचे धोरणात्मक निर्णय परस्पर जाहीर करणे आणि आता आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करून आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असतांना दिलेल्या आदेशांना न्यायालयाकडून स्थगिती आणि तंबी अशा अनेक घटना, घडामोडी सत्तार यांच्या बाबतीत घडत असल्याने त्यांना म्हणावी तशी सत्ता मानवत नसल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच, बच्चू कडूंनी मोठ्या हिरिरीने बंडामध्ये सहभाग घेतला. मात्र शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. उलट सत्ता असतांना मागील जुन्या राजकीय आंदोलन प्रकरणी त्यांना कोर्ट-कचेऱ्या कराव्या लागत आहेत. संजय राठोड यांच्या बाबतही तसेच झाले असून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे गमावलेले मंत्रीपद त्यांना मिळाले. मात्र, त्या प्रकरणाची टांगती तलवार कायम असल्याने तेही खुलेपणाने वावरतांना दिसत नाहीत.
तसेच, मंत्रीपदाचे स्वप्न बघितलेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनाही मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या नेत्याकडून त्यांच्या जखमेवर मिठ चोळत घोषणा आणि टोमणे मारले जात असल्याने तेही दु:खीच आहेत,असेच म्हणावे लागेल.
त्यानंतर दादर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनाही गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या राड्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला असून त्यांची बंदूक जप्त करण्यात आली आहे. त्यांच दु:ख वेगळचं. तसेच शिंदे गटातील अन्य आमदारांचा आततायीपणा शिंदेंच्या चांगलाच अंगलट येत असून विरोधकांनाच्या हाती आयत कोलीत देत आहेत. यामुळे भाजकडूनही यावर नाराजी व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गटाची सत्ता असतांनाही आमदारांना म्हणावं तसं सुख काही घेता येईना, असेच म्हणावे लागेलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.