
Sangli News : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील वीज बिल घोटाळ्यासह बांधकाम परवाने प्रकरणात अटकेत असलेल्या लाचखोर उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. या मुद्द्याचे पडसाद बुधवारी (ता.9) विधिमंडळात उमटले. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी वीज बिल घोटाळ्याची चौकशी महिन्यात पूर्ण केली जाईल, तसेच लाचखोरीची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणातही तत्काळ निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे आता तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सहआरोपी केले जाते का हे पाहावं लागणार आहे. (MLA Sadabhau Khot raising a demand in the Assembly over a ₹1.28 crore scam and action on corrupt Deputy Commissioner)
नागरिक जागृती मंचचे कार्यकर्ते सतीश साखळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर यांनी सातत्याने या घोटाळ्याचा पाठपुरावा केला होता. तसेच महापालिका प्रशासनास चौकशीस भाग पाडले होते. एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीतील चौकशीत 1.28 कोटींचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
मात्र, या प्रकरणात केवळ इतकाच अपहार झालेला नसून, त्यामागे मोठा भ्रष्टाचार दडला आहे. हे सनदी लेखापालांमार्फत करण्यात आलेल्या स्वतंत्र लेखा परीक्षणातून उघड झाले आहे. या लेखापरीक्षणातून, महापालिकेच्या वीज बिलांच्या गैरव्यवहारातून तब्बल 3.45 कोटींचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते दहा वर्षांतील बिलांची चौकशी झाली, तर ही रक्कम दहा कोटींवर जाईल. लोकायुक्तांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला. चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश झाले. मात्र, ही चौकशी महापालिकेतील काही अधिकारी दडपून ठेवत आहेत. खोत यांनी विधिमंडळात आज चर्चा उपस्थित केली.
खोत यांनी घोटाळ्याचा मुद्दा सभागृहात जोरदारपणे मांडला. चौकशीची प्रक्रिया का लांबते आहे, असा सवाल उपस्थित केला. दरवर्षी लेखापरीक्षण करणारे काय करतात. त्यांच्यासह दोषींवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. खोत यांनी अलीकडेच घडलेल्या उपायुक्त वैभव साबळे याच्या लाचखोर प्रकरणाबाबत चर्चा उपस्थित केली. त्यांनी तत्कालीन आयुक्त गुप्ता, उपायुक्त साबळे यांच्यात लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप केला. या काळात त्यांनी वीज बिल घोटाळा, दफनभूमी भूसंपादन घोटाळा दडपला. वीज बिल घोटाळ्याचा चौकशी अधिकारी साबळे लाचखोरीत अडकला. या सर्व बाबींचा विचार करून गुप्ता यांनाही सहआरोपी करा. त्यांनाही चौकशीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी आमदार खोत यांनी केली.
धनादेश वटवून महापालिकेच्या इतिहासातील हा अभिनव असा वीज बिल घोटाळा आहे. घोटाळ्याच्या सुनावणीदरम्यान लोकायुक्तही थक्क झाले. त्यांनी तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांना असे काही घडलेय का, अशी उलट चौकशी करून खातरजमा करून घेतली. त्यांच्या होकारानंतर लोकायुक्तांनी असे अन्य महापालिकांमध्ये घडले आहे का, याची चौकशी करण्याचे नगरविकास विभागाच्या सचिवांना दिले होते.
या घोटाळ्यात साडेचारशेंवर वीज मीटरची देयके भागवण्यासाठी दिलेले धनादेश आठशेंवर नागरिकांच्या खासगी वीज मीटरची देयके भागवण्यासाठी वठवले आहेत. वरकरणी वीज वितरण कंपनीचा कंत्राटी कर्मचारी यात मुख्य आरोपी असला तरी महापालिकेच्या लेखा विभागातील अधिकारी, बिले स्वीकारणाऱ्या बँकेतील कर्मचारी, तसेच वीज वितरणचे काही वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी आहेत. आठ ते दहा वर्षे हा प्रकार सुरू होता. वरिष्ठांच्या सहभागाशिवाय हा घोटाळा शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जायला हवे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.