Kolhapur News, 08 Apr : लोकसभा निवडणुकीनंतर हवेत असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत जनतेने जमिनीवर आणले. मागील विधानसभा निवडणुकीत चार मतदारसंघात हाताचा झेंडा फडकवलेल्या काँग्रेसच्या वाट्याला मात्र यंदा भोपळा आला आणि कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात हळूहळू शिवसेना आणि भाजपने मुसंडी मारली.
या विधानसभेला महायुतीच्या दहाही जागा निवडून आल्या. मात्र एकाही मतदारसंघात काँग्रेसचा पंजा दिसला नाही. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाचा करिष्मा चालला. विधानसभा निवडणुकीतील मतदानाची संख्या पाहता महाविकास आघाडीला दहा लाख मते पडली. त्यातील काँग्रेसची (Congress) पाच लाख मते म्हणता येतील.
सध्या काँग्रेसला आमदार सतेज पाटील यांचा आधार असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांना गृहीत धरल्यानेच या विधानसभेला फटका बसला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिका, पालिका जिल्हा परिषदेत काँग्रेसला विजयी करण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडे असलेली जागा काँग्रेसने खेचून आणत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली. शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाचा करिष्मा आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने लढल्याचा फायदा काँग्रेसला झाला.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकंदरीत महाविकास आघाडीचा करिष्मा दिसत असला तरी हातकणंगलेतून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने विजयी झाले. तर कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेसमधून विजय मिळवला. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन प्रमुख पक्षात फूट निर्माण झाल्याने हा महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला चांगले दिवस येतील अशी शक्यता विधानसभा निवडणुकीत होती.
त्या जोरावरच कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी पाच जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले. मागील चार विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला ते मतदारसंघ काँग्रेसकडे राहिले. पण गेल्या काही वर्षांपासून शिरोळ मतदारसंघावरील ताबा सोडल्यानंतर काँग्रेस मावळत चालली होती.
शिरोळ मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार दिल्याने तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस जिवंत झाली ही काँग्रेससाठी आनंदाची बाब आहे. हीच परिस्थिती चंदगडमध्ये देखील आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चंदगडमधील मूळ काँग्रेसचा कार्यकर्ता जिवंत झाला. पण विधानसभा निवडणुकीत याच कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र राष्ट्रवादीतून आलेले राजेश लाटकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत नाराजी दिसली. प्रमुख पदाधिकाऱ्यांना नेतृत्वाने गृहीत धरल्याचा फटका बसला.
त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसला आपला उमेदवार बदलावा लागला. मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी अखेरच्या क्षणी माघारी घेतल्याने काँग्रेसची अडचण झाली. त्यामुळे आधीच विस्कटलेली काँग्रेसची घडी अधिकच विस्कटली. त्याचा फटका विधानसभेला बसला. अशातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची काँग्रेसवर असलेली नाराजी कायम आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून प्रमुख चार ते पाच सामाजिक विषयांवर आंदोलन करण्यात आली. तर या प्रमुख आंदोलनाला नेत्यांच्या दौऱ्याला काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती लक्षणीय आणि महत्त्वाची मानली जाते. ते काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसचे संघटन, नेतृत्वावरील विश्वास पुन्हा वाढवणे हीच आव्हाने काँग्रेसपुढे असणार आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.