

Baramati, 07 May : आगामी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच निवडणूक लढवतील आणि त्या २०२९ मध्ये मुख्यमंत्री होतील, असे विधान जय पवार यांनी केले आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी जय पवार यांना एक सल्ला दिला. तसेच, भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होता येतं की हे एकनाथ शिंदेंना विचारा, असे आवाहनही केले आहे.
बारामतीत माध्यमांशी बोलताना जय पवार यांनी आगामी २०२९ ची निवडणूक, बारामतीचा उमेदवार आणि सुनेत्रा पवार यांचे मुख्यमंत्रिपद याबाबत भाष्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत यांनी जय पवार यांना एक प्रकारे सल्ला दिल्याचे मानले जात आहे.
सचिन सावंत म्हणाले, आपले आई वडिल मोठे व्हावेत, त्यांची पदोन्नती व्हावी, अशी प्रत्येक मुलांची इच्छा असते, त्यात वावगं असण्याचं कारण नाही. पण, भाजपसोबत राहून मुख्यमंत्रिपद मिळत नाही, तुम्हाला मिळालं असेल तर तेही काढून घेतलं जातं. हे तुम्ही नीतिशकुमार किंवा तुमच्या बाजूला असलेले एकनाथ शिंदे आहेत, त्यांना विचारून घ्या. ते तुम्हाला पटवून सांगतील.
भारतीय जनता पक्षाला एकछत्री अंमल हवा आहे, म्हणूनच मुख्यमंत्री किंवा भाजपचे नेते छातीठोकपणे सांगतात की ७८ टक्के भारतावर पक्षाची सत्ता आहे. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची शक्यता जरी निर्माण करायची असेल तर तुम्हाला भाजपच्या विरोधात उभं राहावं लागेल, तशी हिम्मत तुम्हाला दाखवावी लागेल. लोकशाही, संविधानाच्या रक्षणासाठी लढावं लागेल, एवढं लक्षात ठेवा, असा सल्ला सावंत यांनी दिला आहे.
जय पवार नेमकं काय म्हणाले होते?
अजित पवार यांना मुख्यमंत्री झाल्याचं बारामतीकरांना एकदा पाहायचं होतं. आता सुनेत्रावहिनीही खूप कष्ट घेत आहेत. त्यामुळे २०२९ मध्ये बारामतीतून सुनेत्रा पवार याच निवडणूक लढवतील. आपल्या सर्वांची इच्छा आहे की, सुनेत्रा पवार या २०२९ मध्ये मुख्यमंत्री म्हणून जागा घेतील, असा आशावाद जय पवार यांनी बोलून दाखवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.