

Solapur, 07 May : रस्त्याच्या कामासाठी मिळालेल्या निधीवरून दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली होती. खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहिरातबाजी करत निधी आपल्या पाठपुराव्यामुळेच मिळाल्याचा दावा केला होता. भाजप आमदार सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांनीही सोशल मीडियातून निधीवर दावा सांगितला हेाता. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आमदार देशमुख यांनाच निधी मंजुरीचे पत्र पाठविले होते, त्याच देशमुखांनी तातडीने दिल्ली गाठत गडकरींचे निधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
मोहोळ-बसवनगर-वळसंग या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून ७४० कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. तो निधी आपल्या पाठपुराव्यामुळेच मिळाला आहे, अशी जाहिरातबाजी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केली होती.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही निधीसाठी पाठविलेले पत्र सोशल मीडियात प्रसिद्ध करून आपणही या निधीसाठी पाठपुरावा केला होता, असेही म्हटले होते. तसेच, आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनीही आपण केलेला पाठपुरावा दाखवून दिला होता.
आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली होती. मात्र, देशमुख यांच्याकडून आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही. आमचे काम कायम सुरू असते, असे सांगण्यात आले होते.
एकीकडे काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली असताना खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार सुभाष देशमुख यांना निधी मंजुरीचे पत्र पाठविले होते. त्यामुळे गडकरी आपले वजन देशमुखांच्या पारड्यात टाकले होते. त्यातून निधी कोणामुळे मिळाले, हे गडकरींनीच सांगून टाकले हेाते. त्यामुळे सुभाष देशमुखांनी तातडीने दिल्ली गाठली.
सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या एनएच- ४६५ अंतर्गत मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)- वळसंग या ८१.३७ कि.मी. मार्गाच्या विकासासाठी ₹७४०.३८ कोटींच्या निधीस मंजुरी दिल्याबद्दल सुभाष देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
गडकरींच्या भेटीनंतर देशमुख यांनी म्हटले आहे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमधील दळणवळण अधिक सक्षम, सुरक्षित व वेगवान होणार आहे. तसेच औद्योगिक गुंतवणूक, कृषी वाहतूक व व्यापारी हालचालींना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला नवे बळ प्राप्त होईल.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक आहे. हा प्रकल्प सोलापूरच्या प्रगतीच्या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरेल, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.