Solapur Congress : म्हेत्रेंच्या हाती धनुष्यबाण, माने-हसापुरेंची भाजपशी जवळीक, भालके ‘नॉट रिचेबल’; सोलापुरातून काँग्रेस हद्दपार होण्याच्या मार्गावर!

MP Praniti Shinde News : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भगीरथ भालके हे विधानसभेच्या निकालानंतर राजकीय विजनवसात गेले आहेत. माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिण सोलापूरमधील सुरेश हसापुरे हे काँग्रेसपासून अंतर राखून आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभरातच सोलापूर काँग्रेस अखेरची घटका मोजत आहे.
Solapur Congress Leader
Solapur Congress LeaderSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 May : ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या दोन निवडणुकांतील पराभवाचे उट्टे काढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात लोकसभा निवडणुकीत दिमाखदार विजय मिळविला. मात्र, त्याचा आनंदोत्सव काँग्रेसला सहा महिनेही टिकवता आला नाही. अवघ्या पाच ते सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पुरते पानिपत झाले. मातब्बर नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभरातच काँग्रेस सोलापुरातून हद्दपार होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे लोकसभा निवडणुकीत सोलापूर (Solapur) मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्या. त्यांच्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नेमकी उलटी भूमिका घेतली, त्याचा तोटा काँग्रेस पक्षाबरोबरच मित्र पक्षालाही बसला. काँग्रेसला एकही जागा विधानसभा निवडणुकीत मिळू शकलेली नाही.

गेल्या वर्षभरापासून काँग्रेस नेतृत्व कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी एकही कार्यक्रम देऊ शकलेला नाही, त्यामुळे लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सर्वकाही संपल्याची भावना निकालानंतर निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेससोबत (Congress) असणारे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे आणि भगीरथ भालके सध्या कुठे आहेत, असा प्रश्न पडावा, अशी काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती आहे. खासदार प्रणिती शिंदे वगळता एकही मोठा नेता आज सोलापूर काँग्रेससोबत नाही.

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरातून निवडणूक लढविणारे भगीरथ भालके हे विधानसभेच्या निकालानंतर राजकीय विजनवसात गेले आहेत. माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिण सोलापूरमधील जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे हे काँग्रेस पक्षापासून अंतर राखून आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या वर्षभरातच सोलापूर काँग्रेस अखेरची घटका मोजत असल्यासारखी परिस्थिती आहे.

Solapur Congress Leader
Sushma Andhare on Shirsat : सिद्धांत शिरसाटच्या विरोधातील तक्रार मागे घेताच सुषमा अंधारे आक्रमक; संजय शिरसाटांची कार्यपद्धतीच काढली

माढा लोकसभा आणि त्या मतदारसंघातील विधानसभेच्या सर्व जागांच्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लढवते. त्या मतदारसंघातील करमाळ्याचे जयवंतराव जगताप, माळशिरसचे (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील त्यानंतर, त्यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील, तसेच कल्याणराव काळे, पंढरपूरचे आमदार (स्व.) भारत भालके यांनी पक्ष सोडल्यानंतर ठराविक नेते वगळता या मतदारसंघातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. आता तीच परिस्थिती सोलापूर मतदारसंघातही ओढावली आहे. नाही म्हणायला दिलीप माने, सुरेश हसापुरे, भगीरथ भालके यांच्या नावापुढे अजूनही काँग्रेस नेते लागते. पण तेही सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीला कधी बसतील, याचा नेम नाही.

Solapur Congress Leader
Maharashtra Politic's : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेना-भाजप वाद पेटला; भाजप जिल्हाध्यक्षांची शिंदेंच्या मंत्र्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त असताना शहरात मात्र काँग्रेस आपली ताकद राखून होती. विशेषता माजी महापौर (स्व.) महेश कोठे, माजी सभागृह नेते यू. एन. बेरिया, तौफिक शेख, सुधीर खरटमल अशी जनतेचा पाठिंबा असणारी मंडळी काँग्रेस पक्षासोबत होती. मात्र, कानामागून येऊन तिखट झालेल्या नेतृत्वामुळे या लोकांनी आपला नवा मार्ग शोधत काँग्रेसचा हात केव्हाच सोडला आहे, त्यामुळे सोलापुरात काँग्रेस जिवंत ठेवण्याचे मोठे दिव्य नेतेमंडळींपुढे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com