कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपची (BJP) शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भाजपने कोल्हापुरातील मतदारांनाच दिली आहे, असे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
भाजपचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरातील मतदारांना तुमची ईडीकडून चौकशी होईल अशी धमकी दिली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपचा जनाधार घसरला आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपला महाराष्ट्राच्या जनतेने जागा दाखवून दिलेली आहे. कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकणार हे निश्चित, असल्याचेही पटोले यांनी सांगितले.
भाजपाला कोल्हापुरात पराभव दिसत असल्याने निराशेपोटी चंद्रकांत पाटील यांनी थेट मतदारांनाच धमकी दिली आहे. काही लोक पेटीएमच्या माध्यमातून पैसे वाटत असून तुम्ही ते पैसे घेतले तर त्याची चौकशी ईडीकडून केली जाऊ शकते अशी धमकी देण्यात आली आहे. आता ईडी हजार-पाचशे रुपयांची चौकशी करणार का? आणि ती चौकशी भाजपाच्या इशाऱ्यावर होणार का?
ईडी, आयकर, सीबीआय यांचा मागील सात वर्षात भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात गैरवापर वाढला असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्ता मिळाली नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या नैराश्येतून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन भितीचे वातावरण निर्माण करत आहेत. चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असतात. कोल्हापुरची स्वाभिमानी जनता मात्र या पोटनिवडणुकीतही चंद्रकांत पाटील व भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.